श्रीलंका, मॉरिशसमध्येही ‘युपीआय’चा वापर

दोन्ही देशांमध्ये युपीआय सेवांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मॉरिशस आणि श्रीलंकेसोबत भारताच्या डिजिटल पेमेंट कनेक्टिव्हिटीचा शुभारंभ केला आहे. मागील वर्षी जुलैमध्ये विक्रमसिंघे यांनी नवी दिल्ली दौऱ्यादरम्यान भारतासोबत युपीआय कनेक्टिव्हिटीशी निगडित एका करारावर स्वाक्षरी केली होती. हिंदी महासागर क्षेत्रातील […]

श्रीलंका, मॉरिशसमध्येही ‘युपीआय’चा वापर

दोन्ही देशांमध्ये युपीआय सेवांचा मोदींच्या हस्ते शुभारंभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मॉरिशस आणि श्रीलंकेसोबत भारताच्या डिजिटल पेमेंट कनेक्टिव्हिटीचा शुभारंभ केला आहे. मागील वर्षी जुलैमध्ये विक्रमसिंघे यांनी नवी दिल्ली दौऱ्यादरम्यान भारतासोबत युपीआय कनेक्टिव्हिटीशी निगडित एका करारावर स्वाक्षरी केली होती.
हिंदी महासागर क्षेत्रातील तिन्ही देशांसाठी आज एक विशेष दिन आहे. आज आम्ही स्वत:च्या ऐतिहासिक संबंधांना आधुनिक डिजिटल पद्धतीने जोडत आहोत. लोकांना देण्यात आलेल्या विकासाच्या आश्वासनाच्या पूर्ततेचा हा एक पुरावा आहे. फिनटेक कनेक्टिव्हिटीमुळे केवळ सीमापार देवाणघेवाणीत मदत होणार असे नाही तर सीमापार संबंधही मजबूत होणार आहेत. युपीआयकडे आता नवी जबाबदारी असल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काढले आहेत.
डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरने भारतात मोठा बदल घडवून आणला आहे. आमच्या छोट्यातील छोट्या गावातील छोटे व्यापारीही डिजिटल पेमेंट करत आहेत. यात सुविधेसोबत वेग देखील आहे. शेजारी प्रथम हे भारताचे धोरण आहे. आमचा सागरी दृष्टीकोन एसएजीएआर असून याचा अर्थ क्षेत्रात सर्वांसाठी सुरक्षा आणि विकास आहे. आमचे लक्ष्य पूर्ण क्षेत्रात शांतता, सुरक्षा आणि विकास करणे असल्याचे मोदींनी नमूद पेले आहे.
फ्रान्समध्येही युपीआय सुरू
अलिकडेच 2 फेब्रुवारी रोजी फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये आयकॉनिक आयफेल टॉवरच्या परिसरात युपीआय सेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारत दौऱ्यावर असताना त्यांनी जयपूरमध्ये युपीआय पेमेंट सुविधेचा अनुभव घेतला होता. भारताची युनिफाइड पेमेंट इंटरफेस सिस्टीम (युपीआय) सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरात समवेत अन्य देशांसोबत द्विपक्षीय संबंध वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
युनिफाइड पेमेंट इंटरफेस
युपीआय भारताची मोबाइल आधारित पेमेंट प्रणाली आहे. अनेक बँक खात्यांना एकाच मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये प्रदान करणारी ही प्रणाली आहे. एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड (एनआयपीएल) आणि फ्रान्सची लाइरा कलेक्टने फ्रान्स आणि युरोपमध्ये युनिफाइड पेमेंट इंटरफेस लागू करण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी केली आहे. युपीआयला 2016 मध्ये सादर करण्यात आले होते.नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याची निर्मिती केली आहे. युपीआमुळे सहजपणे थेट बँक खात्यात पैसे जमा करण्याची सुविधा प्राप्त झाली आहे.
रुपे कार्डचीही सुविधा
श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये युपीआय सुविधा सुरू झाल्यावर दोन्ही देशांचे लोक याचा वापर करू शकणार आहेत. याचबरोबर भारतातून मॉरिशस आणि श्रीलंकेत जाणारे पर्यटक तसेच तेथून भारतात येणारे पर्यटक देखील याच्या माध्यमातून पेमेंट करू शकतील. मॉरिशसमध्sय केवळ युपीआयच नव्हे तर रुपे कार्ड सेवेचाही शुभारंभ करण्यात आला आहे. दरवर्षी सुमारे 5 हजारांहून अधिक भारतीय पर्यटक हे मॉरिशसमध्ये पोहोचतात. तर तेथील एकूण लोकसंख्येत भारतीय वंशीय लोकांची संख्या लक्षणीय आहे.