दोन जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
ट्रकने दुचाकीला फरफटत नेले : सावर्डे परिसरावर शोककळा,आज दोघांरही अंत्यसंस्कार
मडगाव : रालोय-कुडतरी येथे काल शुक्रवारी दुपारी 2 वाजता दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत झाला. रस्त्याच्या हॉटमिक्ससाठी डांबरमिश्रीत खडी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ताबा सुटल्याने दुचाकीवरून जाणारे तन्वेश नाईक (21 वर्षे, टोनीनगर-सावर्डे) व श्रीकर नाईक (वय 19 वर्षे, आनंदवाडी-सावर्डे) हे दोघेही चिरडले गेल्याने जागीच ठार झाले. दोन जीवलग मित्र असे अकाली गेल्याने संपूर्ण सावर्डे परिसरात दु:खाचे सावट पसरले आहे. आज शनिवारी त्यांच्यावर सावर्डे येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मयत श्रीकर हा सावर्डे पंचायतीचे माजी पंच सदस्य नीळकंट नाईक यांचा मुलगा आहे. श्रीकर व तन्मय हे दोघेही मनमिळावू तसेच कुणाच्याही मदतीच्या हाकेला धावणारे होते.
ट्रकचालकाचा ताबा सुटला
सांतोण-सावर्डे येथील हॉटमिक्स प्रकल्पातील डांबरमिश्रित खडी घेऊन ट्रक क्रमांक जीए 02 यु 6717 हा चांदोरमार्गे मडगावला येत होता. एमपीटीतील कोळसा घेऊन अन्य एक ट्रक चांदोरमार्गे सावर्डेच्या दिशेने जात होता. दोन्ही ट्रक रालोय येथील अरूंद रस्त्यावर समोरासमोर आले असता कोळसावाहू ट्रकचे डिस्क डांबराची वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या डिस्कला घासले. त्यामुळे डांबरवाहू ट्रक चालकाचा ताबा सुटला.
फरफटत नेल्याने जागीच मृत्यू
याचवेळी मडगावहून चांदोरच्या दिशेने येणाऱ्या मोटारसायकल क्रमांक जीए 02 क्यू 9764 ला धक्का देऊन तो ट्रक शेतजमिनीत जाऊन पडला. दुचाकीवरील तन्वेश आणि श्रीकर यांना ट्रकने दूरपर्यंत फरफटत नेल्याने त्यांना जागीच मृत्यू आला. हा भीषण अपघात घडताच स्थानिक शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीवरील दोन्ही तरूण ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले होते. दोघांचेही मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत शेतात पडले होते. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. या अपघात प्रकरणी मायणा-कुडतरी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
दोघेही एकाच दिवशी साजरा करायचे
तन्वेश नाईक याचा वाढदिवस 14 जून रोजी तर श्रीकर नाईक याचा वाढदिवस 15 जून रोजी होता. परंतु, दोघेही एकाच दिवशी वाढदिवस साजरा करायचे. दोघे जीवलग मित्र असल्याने दोघांचे उठणे-बसणे, फिरणे, खाणे-पिणे एकत्रित असायचे. दोघांनाही दुर्दैवी मृत्यू आल्याने सावर्डेच्या टोनीनगर व आनंदवाडी भागावर शोककळा पसरली आहे. दोघांवर अंत्यसंस्कारसुद्धा एकाच स्मशानभूमीत केले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
Home महत्वाची बातमी दोन जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
दोन जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू
ट्रकने दुचाकीला फरफटत नेले : सावर्डे परिसरावर शोककळा,आज दोघांरही अंत्यसंस्कार मडगाव : रालोय-कुडतरी येथे काल शुक्रवारी दुपारी 2 वाजता दोन जिवलग मित्रांचा दुर्दैवी अंत झाला. रस्त्याच्या हॉटमिक्ससाठी डांबरमिश्रीत खडी घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ताबा सुटल्याने दुचाकीवरून जाणारे तन्वेश नाईक (21 वर्षे, टोनीनगर-सावर्डे) व श्रीकर नाईक (वय 19 वर्षे, आनंदवाडी-सावर्डे) हे दोघेही चिरडले गेल्याने जागीच ठार झाले. […]