लपंडाव खेळताना विहिरीत पडून मुलाचा दुर्दैवी मृत्यू

अनगोळ-कुरबर गल्ली येथील घटना : एक मुलगा सुदैवाने बचावला : घटनेने परिसरात हळहळ व्यक्त बेळगाव : अनगोळ येथील कुरबर गल्ली परिसरात अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतलेल्या या मुलासह आणखी काही मुले पूजेला अजून उशीर आहे म्हणून लपंडाव खेळत होती. यावेळी घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या […]

लपंडाव खेळताना विहिरीत पडून मुलाचा दुर्दैवी मृत्यू

अनगोळ-कुरबर गल्ली येथील घटना : एक मुलगा सुदैवाने बचावला : घटनेने परिसरात हळहळ व्यक्त
बेळगाव : अनगोळ येथील कुरबर गल्ली परिसरात अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतलेल्या या मुलासह आणखी काही मुले पूजेला अजून उशीर आहे म्हणून लपंडाव खेळत होती. यावेळी घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या विहिरीत तोल जाऊन दोन मुले पडली. त्यामधील एका मुलाचा बुडून मृत्यू झाला तर एक मुलगा सुदैवानेच बचावला आहे. सोमवारी रात्री 9 वाजता ही घटना घडली. अरव किरण शारबिद्रे (वय 11, रा. कुरबर गल्ली, अनगोळ) असे त्या मृत्यू झालेल्या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. तर या घटनेत सुहास परशुराम सुतार याने विहिरीतील पाईप धरल्याने तो बचावला आहे. गल्लीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या उत्साहाने अरव आणि सुहासने भाग घेतला होता. अरवने रांगोळीही काढली होती. सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र पूजेला उशीर आहे म्हणून अरव, सुहास आणि काही मुलांनी लपंडाव खेळण्याचे ठरविले.
त्यानंतर मुले लपण्यासाठी जागा शोधत होती. त्यावेळी हे दोघे कुरबर गल्ली येथील राजेंद्र विठ्ठलराव पाटील यांच्या घराच्या पाठीमागील विहिरीच्या कठड्यावर लपून बसले. मात्र अचानक तोल जाऊन दोघेही विहिरीत पडले. ही घटना दुसऱ्या मुलाने पाहिली. त्यानंतर त्याने आरडाओरडा केला. तातडीने काहीजणांनी विहिरीकडे धाव घेतली. सुहासने विहिरीतील पाईप धरला तर त्यानंतर अरवचा हातही पकडला. मात्र एका हाताने त्याला धरून ठेवणे अवघड झाले. काहीवेळाने त्या दोघांनाही बाहेर काढले. मात्र अरव हा बेशुद्ध झाला होता. तातडीने त्याला खासगी इस्पितळाकडे हलविण्यात आले. मात्र काही ठिकाणी असलेल्या इस्पितळांमध्ये डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे धावपळ करावी लागली. शेवटी एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी अरव याच्यावर शर्थीचे प्रयत्न केले. मात्र त्याचा मृत्यू झाला. या घटनेने कुरबर गल्ली परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अरव याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, काका, काकी असा परिवार आहे. याप्रकरणी विहीर मालकाविरोधात टिळकवाडी पोलीस स्थानकात मयत अरवच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.