दुर्दैवी! 28 काळविटांचा दोन दिवसांत मृत्यू
भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयातील अक्षम्य प्रकार : प्राणीप्रेमींतून हळहळ
प्रतिनिधी/ बेळगाव
भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा दोन दिवसांत गूढ मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून विषाणूंच्या संक्रमणामुळे काळविटांचा मृत्यू झाला असावा, असा संशय वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वनमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याची सूचना केली आहे.
उपलब्ध माहितीनुसार 13 नोव्हेंबर रोजी 8 काळविटांचा मृत्यू झाला होता. त्यांच्यावर उत्तरीय तपासणी करून त्याचे नमुने प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येण्याआधीच शनिवारी आणखी 20 काळविटांचा मृत्यू झाला आहे. केवळ दोन दिवसांत झालेल्या वन्यप्राण्यांच्या मृत्युमुळे वनाधिकारीही हादरून गेले आहेत.
बन्नेरघट्टा उद्यानातील तज्ञ बेळगावला निघाले आहेत. सध्या 28 पैकी 25 मृतदेहांची उत्तरीय तपासणी पूर्ण झाली असून तज्ञांचे पथक बेळगावात दाखल झाल्यानंतर उर्वरित 3 मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली जाणार आहे. या प्राणी संग्रहालयात एकूण 38 काळवीट होते. 28 प्राणी दगावल्यामुळे आता केवळ 10 शिल्लक राहिले आहेत. या वन्यप्राण्यांच्या मृत्यूची कारणे शोधण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयात प्राण्यांची संख्या वाढविल्यानंतर या ठिकाणी भेट देणाऱ्या प्राणीप्रेमींची संख्याही वाढली होती. व्यवस्थितपणे देखभाल न केल्याने या प्राण्यांचा मृत्यू झाला आहे की विषाणूंच्या संक्रमणामुळे? याचा उलगडा शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतरच होणार आहे. एसीएफ नागराज बाळेहोसूर, प्राणी संग्रहालयाचे संरक्षणाधिकारी पवन कर्निंग आदी अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून होते.
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागूनच हे प्राणी संग्रहालय आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या विशेष पुढाकारामुळे या प्राणी संग्रहालयात वाघ, सिंह, बिबटे, तरस, काळवीट, मगर, मोर, विविध पक्षी आदी प्राणी-पक्ष्यांची भर पडली. केवळ बेळगावच नव्हेतर शेजारच्या जिल्ह्यातूनही विद्यार्थी व प्राणीप्रेमी या संग्रहालयाला भेट देत आहेत. केवळ दोन दिवसांत 28 काळवीट दगावल्यामुळे वनखात्याच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत.
गुरुवार दि. 13 नोव्हेंबर रोजी 8 काळविटांचा मृत्यू झाला. त्याचवेळी वनखात्याचे अधिकारी व पशुवैद्य आदींनी खबरदारी घेतली असती तर उर्वरित 20 काळविटांना वाचविता आले असते. त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. सध्या 3 काळविटांचे मृतदेह शीतगृहात ठेवण्यात आले आहेत. बन्नेरघट्टा येथील तज्ञांचे पथक बेळगावात दाखल झाल्यानंतर त्यांची उत्तरीय तपासणी होणार आहे.
प्राणी संग्रहालयातील 38 पैकी 28 काळविटांचा मृत्यू झाल्यानंतर उर्वरित 10 काळविटांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आले आहेत. ही घटना वनखात्याच्या बेजबाबदारपणामुळे झाली आहे की कोणत्या तरी आजाराने या वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला? याचा उलगडा लवकरच होणार आहे.
संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश
वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. केवळ दोन दिवसांत 28 काळविटांचा मृत्यू होतो, याचे आपल्यालाही दु:ख वाटते. विषाणूंच्या संक्रमणामुळे काळविटांचा मृत्यू झाल्याचे सध्या अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितले आहे. अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा दिसून आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे वनमंत्र्यांनी सांगितले.
Home महत्वाची बातमी दुर्दैवी! 28 काळविटांचा दोन दिवसांत मृत्यू
दुर्दैवी! 28 काळविटांचा दोन दिवसांत मृत्यू
भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयातील अक्षम्य प्रकार : प्राणीप्रेमींतून हळहळ प्रतिनिधी/ बेळगाव भुतरामहट्टी येथील राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील 28 काळविटांचा दोन दिवसांत गूढ मृत्यू झाला आहे. या घटनेने एकच खळबळ माजली असून विषाणूंच्या संक्रमणामुळे काळविटांचा मृत्यू झाला असावा, असा संशय वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वनमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल देण्याची सूचना केली आहे. उपलब्ध […]
