प्रतिमा बसविण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना अल्टीमेटम
19 फेब्रुवारीपर्यंत दिला वेळ : छत्रपती शिवाजी महाराज-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा बसवण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
बेळगाव : लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बेळगाव रेल्वेस्थानकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा वर्ष उलटले तरी अद्याप बसविण्यात आलेल्या नाहीत. अनेकवेळा नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवूनदेखील त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने संतप्त झालेल्या शिव व भीम सैनिकांनी बुधवारी बेळगाव रेल्वेस्थानकातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दि. 19 फेब्रुवारीपर्यंत प्रतिमा लावण्याचे अल्टीमेटम देण्यात आले असून प्रतिमा न लावल्यास स्वत: प्रतिमा बसविण्याचा इशारा रेल्वे विभागाला देण्यात आला आहे.
ब्रिटिशकालीन असलेल्या बेळगाव रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले. 190 कोटी रुपये खर्च करून रेल्वेस्थानकाला नवीन रूप देण्यात आले. फेब्रुवारी 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रेल्वेस्थानकाचे उद्घाटन करण्यात आले. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वारावर बेळगावमध्ये घडलेल्या घटना, तसेच क्रांतिकारकांच्या प्रतिमा बसविण्यात आल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा नसल्याने नाराजीचा सूर उमटला होता. तयार करण्यात आलेल्या प्रतिमा अडगळीत ठेवण्यात आल्या होत्या. त्यावेळी श्रीराम सेना हिंदुस्थान व दलित संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मोठे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी प्रतिमा बसविण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
अनेकवेळा नैर्त्रुत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, हुबळी विभागीय व्यवस्थापकांना पत्र पाठवूनदेखील त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद देण्यात आलेला नाही. तसेच आता या प्रतिमा जीर्ण होऊ लागल्या आहेत. यासाठी बुधवारी श्रीराम सेनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर व दलित संघटनेचे नेते मल्लेश चौगुले यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. स्टेशन व्यवस्थापकांनी आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठविल्याचे सांगितले. परंतु दरवेळी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला जात असल्याने अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावण्यात आले. यावेळी निंगाप्पा कांबळे, सिद्धाप्पा कांबळे यांसह मोठ्या संख्येने भीम व शिव सैनिक उपस्थित होते.
19 फेब्रुवारीपर्यंत अल्टीमेटम
अनेकवेळा विनंती करूनही प्रतिमा न बसविल्याने 19 फेब्रुवारीपर्यंतचे अल्टीमेटम देण्यात आले आहे. प्रतिमा न बसविल्यास शिव व भीम सैनिक स्वत: रेल्वेस्थानकाच्या मुख्य इमारतीवर प्रतिमा बसवतील, असा इशारा रमाकांत कोंडुस्कर यांनी दिला. तसेच रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करू, असा इशारा मल्लेश चौगुले यांनी दिला.
Home महत्वाची बातमी प्रतिमा बसविण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना अल्टीमेटम
प्रतिमा बसविण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना अल्टीमेटम
19 फेब्रुवारीपर्यंत दिला वेळ : छत्रपती शिवाजी महाराज-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा बसवण्याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना घेतले फैलावर बेळगाव : लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बेळगाव रेल्वेस्थानकात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा वर्ष उलटले तरी अद्याप बसविण्यात आलेल्या नाहीत. अनेकवेळा नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवूनदेखील त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने […]