मंगल कार्यालयांतून दागिने चोरणाऱ्या उज्ज्वलनगरच्या चोरट्याला अटक

चार लाखाचे दागिने जप्त : दोन ठिकाणी चोरीची कबुली : टिळकवाडी पोलिसांची कारवाई बेळगाव : मंगल कार्यालयात वऱ्हाडी बनून वधू-वरांचे दागिने चोरणाऱ्या उज्ज्वलनगर येथील एका तरुणाला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी शुक्रवारी रात्री एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सोहेल मौला ताशावाले (वय 26) […]

मंगल कार्यालयांतून दागिने चोरणाऱ्या उज्ज्वलनगरच्या चोरट्याला अटक

चार लाखाचे दागिने जप्त : दोन ठिकाणी चोरीची कबुली : टिळकवाडी पोलिसांची कारवाई
बेळगाव : मंगल कार्यालयात वऱ्हाडी बनून वधू-वरांचे दागिने चोरणाऱ्या उज्ज्वलनगर येथील एका तरुणाला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी शुक्रवारी रात्री एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. सोहेल मौला ताशावाले (वय 26) रा. उज्ज्वलनगर असे त्या भामट्याचे नाव आहे. त्याच्याजवळून 4 लाख 10 हजार रुपये किमतीचे 58.04 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक कपिलदेव गडाद व त्यांच्या सहकाऱ्यांनी शुक्रवारी ही कारवाई केली आहे. सध्या लग्नसराई सुरू आहे. यंदा मुहूर्त कमी असल्यामुळे बहुतेक मंगल कार्यालये फुल्ल आहेत. लग्नसराईचा गैरफायदा घेत वऱ्हाडी बनून मंगल कार्यालयात शिरून वधू-वरांचे दागिने पळविण्यात सोहेल पटाईत आहे. गेल्या महिन्यात त्याने केवळ आठ दिवसांत दोन मंगल कार्यालयात शिरून दागिने चोरले होते. दि. 13 एप्रिल रोजी महावीर भवन येथे, तर 21 एप्रिल रोजी सिटी हॉल, भाग्यनगर येथे झालेल्या लग्न समारंभात सोहेलने दागिने चोरले होते. यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. मंगल कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजवरून टिळकवाडी पोलिसांनी भामट्याचा शोध घेतला आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असून गेल्या महिन्यात दोन मंगल कार्यालयात चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे. उपलब्ध माहितीनुसार सोहेलने केलेले हे पहिलेच गुन्हे आहेत. तिसऱ्या मंगल कार्यालयात घुसण्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
यापूर्वीही एकाला अटक
मंगल कार्यालयातील दागिने चोरणाऱ्याला अटक करण्याची चार महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी 4 जानेवारी 2024 रोजी विद्याधिराज कल्याण मंटपात दागिने चोरलेल्या इम्तियाज महम्मदगौस हुबळीवाले (वय 63) रा. वीरभद्रनगर याला अटक केली होती. त्याच्याजवळून 3 लाख 55 हजार 500 रुपये किमतीचे चोरीचे दागिने जप्त केले होते. त्यानंतर टिळकवाडी पोलिसांनी मंगल कार्यालयात दागिने चोरणाऱ्या तरुणाला अटक केली आहे.