युगांडा ऑलआऊट 40, न्यूझीलंडचा दणकेबाज विजय

वृत्तसंस्था/ त्रिनिदाद अँड टोबॅगो टी 20 विश्वचषकाच्या साखळी फेरीतून बाहेर पडलेल्या न्यूझीलंडने शनिवारी झालेल्या सामन्यात युगांडाचा 9 गडी व 88 चेंडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या युगांडचा डाव किवीज गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर अवघ्या 40 धावांवर आटोपला. यानंतर विजयी लक्ष्य किवीज संघाने 5.2 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. दरम्यान, अवघ्या 4 धावांत 3 बळी […]

युगांडा ऑलआऊट 40, न्यूझीलंडचा दणकेबाज विजय

वृत्तसंस्था/ त्रिनिदाद अँड टोबॅगो
टी 20 विश्वचषकाच्या साखळी फेरीतून बाहेर पडलेल्या न्यूझीलंडने शनिवारी झालेल्या सामन्यात युगांडाचा 9 गडी व 88 चेंडू राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या युगांडचा डाव किवीज गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर अवघ्या 40 धावांवर आटोपला. यानंतर विजयी लक्ष्य किवीज संघाने 5.2 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. दरम्यान, अवघ्या 4 धावांत 3 बळी मिळवणाऱ्या न्यूझीलंडच्या टीम साऊदीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
प्रथम फलंदाजी करताना युगांडच्या फलंदाजांनी किवीज गोलंदाजासमोर सपशेल लोटांगण घातले. किवीज गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर केनेथ वायस्वा वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. वायस्वाने सर्वाधिक 11 धावा केल्या. इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने युगांडाचा डाव 18.4 षटकांत 40 धावांवर संपला. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने 4 धावांत 3 बळी घेतले. याशिवाय, ट्रेंट बोल्ट, रचिन रविंद्र व सँटेनर यांनी प्रत्येकी दोन गड्यांना तंबूचा रस्ता दाखवला.
युगांडाने विजयासाठी दिलेले 41 धावांचे लक्ष्य किवीज संघाने 5.2 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. सलामीवीर फिन अॅलन 9 धावा करुन बाद झाला. यानंतर कॉनवेने 4 चौकारासह नाबाद 22 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात किवीज संघाला 9 धावा अतिरिक्त मिळाल्या. दरम्यान, न्यूझीलंडचे वर्ल्डकपमधील आव्हान समाप्त झाले असून सध्या 3 सामन्यात त्यांचे 2 गुण झाले आहेत. आता गटातील त्यांचा शेवटचा सामना पापुआ न्यू गिनीविरुद्ध होईल. दुसरीकडे युगांडाचे स्पर्धेतील सर्व सामने संपले असून चार पैकी एका सामन्यात विजय तर तीन सामन्यात पराभव अशी त्यांची कामगिरी राहिली.