साहित्य संमेलनासाठी उचगावनगरी सज्ज

आज 22 वे संमेलन : जागृत मळेकरणी देवीच्या प्रांगणात चार सत्रात आयोजन उचगाव/वार्ताहर सीमाभागातील मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन व्हावे, या भागात नवीन साहित्यिक निर्माण व्हावेत, युवक-युवतांमध्ये वाचन, लिखाणाची आवड निर्माण व्हावी आणि मराठी साहित्याचा प्रसार व्हावा या हेतूने उचगाव येथे 22 वे साहित्य संमेलन रविवार दि. 14 रोजी होत आहे .संमेलनासाठी सर्वत्र भगव्या पताका, […]

साहित्य संमेलनासाठी उचगावनगरी सज्ज

आज 22 वे संमेलन : जागृत मळेकरणी देवीच्या प्रांगणात चार सत्रात आयोजन
उचगाव/वार्ताहर
सीमाभागातील मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन व्हावे, या भागात नवीन साहित्यिक निर्माण व्हावेत, युवक-युवतांमध्ये वाचन, लिखाणाची आवड निर्माण व्हावी आणि मराठी साहित्याचा प्रसार व्हावा या हेतूने उचगाव येथे 22 वे साहित्य संमेलन रविवार दि. 14 रोजी होत आहे .संमेलनासाठी सर्वत्र भगव्या पताका, कमानी व गल्लीतून रांगोळ्या काढून  स्वागतासाठी उचगावनगरी सज्ज झाली आहे.
उचगावच्या निसर्गरम्य आमराईतील जागृत मळेकरणी देवीच्या प्रांगणात महाराष्ट्र राज्यातून येणारे दिग्गज साहित्यिक आणि बेळगाव, निपाणी, चंदगड, खानापूर या तालुक्यांतून उपस्थित राहणाऱ्या साहित्यप्रेमी, विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या साक्षीने हा संमेलन सोहळा संपन्न होणार आहे.
 संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मणराव महाडिक
संमेलनाचे उद्घाटन चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मण होनगेकर व एन. ओ. चौगुले उपस्थित राहणार आहेत. पहिल्या सत्रात सकाळी 11 ते 12 वा. संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मणराव महाडिक यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून चंदगडचे आमदार राजेश पाटील, तऊण भारतचे समूह प्रमुख तथा सल्लागार संपादक किरण ठाकुर यासह मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या सत्रात ज्ञानेश्वर पठाडे यांचे संत साहित्य यावर विचार मंथन होणार आहे. वनभोजनानंतर तिसऱ्या सत्रात हास्य कवी संमेलनमध्ये शरद धनगर, नितीन वरणकार, अरुण पवार यांचा सहभाग असणार आहे. चौथ्या सत्रात बंडा जोशी यांचा विनोदी हास्य पंचमी कार्यक्रम होणार आहे.
विद्यार्थीवर्गाचा उत्साह
गेल्या 21 वर्षांपासून भरवत असलेल्या कार्यकर्त्यांचा, आयोजकांचा आणि परिसरातील उचगाव, अतिवाड, बेकिनकेरे, बसुर्ते, कोणेवाडी, बाची, तुरमुरी, कल्लेहोळ, सुळगा, हिंडलगा, मण्णूर, गोजगे, आंबेवाडी, बेनकनहळ्ळी येथील विद्यार्थीवर्गाचा उत्साह कायम आहे. एक दिवस श्रोता, वक्ता, कार्यकर्ता अशा वेगवेगळ्या भूमिकांतून उत्सवाशी समरस होत आहेत. संमेलनाच्या निमित्ताने वर्षातून एकदाच उचगाव साहित्य संमेलनाच्या दिवशी साहित्यप्रेमींसाठी दुपारी मळेकरणी देवीच्या आमराईत गोड वनभोजनाचा आस्वाद दिला जातो. यावर्षीही तो सर्वांना मिळणार आहे.
मध्यवर्ती गणेश-विठ्ठल मंदिर येथे सकाळी गणेश पूजन सुधीर पाटील व सुश्मिता पाटील, विठ्ठल-रखुमाई पूजन तुकाराम पाटील व बेबीताई पाटील, श्रीराम पूजन आप्पासाहेब गुरव, अस्मिता गुरव, पालखी पूजन ज्योतिबा अमरोळकर, रूपा अमरोळकर, ग्रंथदिंडी उद्घाटन जितेंद्र मांगलेकर, मनीषा मांगलेकर, छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन दिगंबर पवार, सुवर्णा पवार, मळेकरणी देवीचे पूजन शिवाजीराव अतिवाडकर, सुमन अतिवाडकर, पुस्तक प्रदर्शन उद्घाटन इक्बाल जमादार, सभामंडपाचे उद्घाटन एन. एस. चौगुले, गीता चौगुले, व्यासपीठाचे उद्घाटन बाळकृष्ण तेरसे, मथुरा तेरसे, सरस्वती फोटो पूजन आर. एम. चौगुले, प्रीती चौगुले, ज्ञानेश्वर फोटो पूजन जीवन कदम, नीलम कदम आदी मान्यवरांच्या हस्ते होत आहे.साहित्य रसिकांनी उपस्थिती दर्शवून संमेलनाचा आनंद लुटावा, अशी विनंती  अकादमीच्यावतीने करण्यात येत आहे.