‘उबाठा’कडे अजेंडा पण नाही आणि स्वतःचा झेंडा पण नाही, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली. हिंगोलीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या सभेनंतर बाबुराव कदम कोहळीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा इथे आला आहे. बाळासाहेबांचा ८०% समाजकारणाचा वारसा आम्ही पुढे नेत आहोत. यापूर्वी ज्या पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण होत होते. बाळासाहेबांच्या प्रखर विचारांचे खच्चीकरण झाले. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देऊ लागले. मतदारांनी जो विश्वास दाखवला होता त्याला बाजूला केले. एका बाजूला बाळासाहेबांचा फोटो दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावून मते मागितली होती. जनतेने तुम्हाला कौल दिला. मात्र ज्यांचे आयुष्य कट, कमिशन, करप्शनमध्ये गेले त्या कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून ‘उबाठा’ बसलेत. त्यांच्याकडे अजेंडा नाही आणि झेंडाही नाही. विरोधकांना नरेंद्र मोदी यांच्या विषयीच्या द्वेषाने पछाडलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जितका तिरस्कार कराल, तितकी त्यांची मते वाढतील. २०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये मतदारांनी विरोधकांना निवडणुकीत जागा दाखवून दिली असं त्यांनी सांगितले.
तसेच बाबुराव कदम हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. बाबुराव कदम यांच्या मागे मुख्यमंत्री खंबीरपणे उभे आहेत. मागच्या सरकारचे मुख्यमंत्री असते तर निवडणुकीत किती खर्च करणार? आम्हाला किती देणार? असा प्रश्न बाबुराव कदमांना विचारला असता मात्र आमच्याकडे हे चालत नाही. आता बाबुरावांना तिकिट मागण्यासाठी मुंबईला येण्याची गरज नाही. हिंगोली, यवतमाळ मोठ्या मताधिक्याने जिंकायचे आहे आणि बाबुराव कदम यांना थेट दिल्लीला खासदार म्हणून पाठवायचे, चांगल्या लोकांना पुढे आणण्याचे काम आम्ही शिवसेनेत करतोय असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
Edited by -Ratnadeep Ranshoor