भीषण अपघातात दोघे तरुण ठार

खानापूर-जांबोटी मार्गावर बुधवारी मध्यरात्री खानापूरजवळ अपघात : एकजण गंभीर जखमी खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावर खानापूरजवळील (कुंभार ओहोळ) नाल्यावरील पुलाच्या संरक्षक कठड्याला भरधाव कारने धडक दिल्याने दोघे तरुण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात बुधवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास  घडला. मोहन गोमानाचे (वय 27, रा. मच्छे) आणि आशिष मोहन पाटील (वय 26, रा. हत्तरवाड) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. याबाबत […]

भीषण अपघातात दोघे तरुण ठार

खानापूर-जांबोटी मार्गावर बुधवारी मध्यरात्री खानापूरजवळ अपघात : एकजण गंभीर जखमी
खानापूर : खानापूर-जांबोटी मार्गावर खानापूरजवळील (कुंभार ओहोळ) नाल्यावरील पुलाच्या संरक्षक कठड्याला भरधाव कारने धडक दिल्याने दोघे तरुण जागीच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात बुधवारी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास  घडला. मोहन गोमानाचे (वय 27, रा. मच्छे) आणि आशिष मोहन पाटील (वय 26, रा. हत्तरवाड) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी, मच्छे येथील शंकर उर्फ मिथुन मोहन गोमानाचे, निकेश जयवंत पवार, जोतिबा गोविंद गावकर तसेच खानापूर तालुक्यातील हत्तरवाड येथील आशिष मोहन पाटील हे सर्वजण बुधवार दि. 11 रोजी काही कामानिमित्त खानापूरला आले होते. रात्री उशिरा खानापूर येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून कारगाडीने (केए 22 एमसी 2913) जांबोटी रस्त्याने जात असता खानापूरजवळील कुंभार नाल्यावरील पुलावर
चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने नाल्यावरील पुलाच्या संरक्षक कठड्याला धडक दिल्याने शंकर मोहन गोमानाचे (वय 27, रा. मच्छे) आणि आशिष मोहन पाटील (वय 26, रा. हत्तरवाड) हे दोघेजण जागीच ठार झाले. या अपघातात निकेश जयवंत पवार (वय 25, रा. मच्छे) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बेळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालकाच्या बाजूला बसलेला जोतिबा गोविंद गावकर (वय 27, रा. मच्छे) हा किरकोळ जखमी झाला आहे. या अपघाताची नोंद खानापूर पोलीस स्थानकात झाली आहे. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर
हा अपघात इतका भयानक होता की कारचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. तर इंजिनही पूर्णपणे निकामी झाले आहे. मध्यरात्री दीड वाजता अपघात झाला त्यावेळी हा रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता. या रस्त्यावरून वाहतूकही नव्हती. त्यामुळे मदतीला कोणीही आले नाही. अपघातस्थळी कोणतेही मदतकार्य पोहोचू शकले नाही. निकेश हा गंभीर जखमी झाला होता. तो मदतीसाठी आवाज देत होता. मिथुन आणि आशिष हे जागीच ठार झाले होते. जोतिबा गावकर हा अपघातानंतर घाबरून गेला होता. अपघातानंतर बऱ्याच वेळाने त्याने 112 वर पोलिसांना संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी मदतकार्य सुरू केले. आशिष पाटील याच्या पश्चात आई, वडील, एक लहान बहीण आणि आजी असा परिवार आहे. आशिष याचे आईवडील कामानिमित्त मच्छे येथे गेल्या काही वर्षांपासून राहत आहेत. त्यांच्या मूळगावी हत्तरवाड येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मिथुन याच्या पश्चात आई आणि एक भाऊ असा परिवार आहे. मच्छे स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मध्यरात्रीच पोलिसांकडून मदतकार्य
जोतिबा गोविंद गावकर हा चालकाच्या शेजारी बसला होता. इतका भयानक अपघात होऊनही दैव बलवत्तर म्हणून तो किरकोळ जखमी झाला आहे. त्यानेच रात्री दीड वाजता 112 वर पोलिसांना फोन करून अपघात झाल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस वाहन अपघातास्थळी दाखल झाले.  त्यानंतर जखमींना आणि मृत्यू झालेल्या दोघांना बाहेर काढून खानापूर इस्पितळात हलविण्यात आले. निकेश पवार हा गंभीर जखमी असल्याने त्याला रात्रीच बेळगावला हलविण्यात आले आहे. त्याच्यावर खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.