वेर्णातील कंपनीत दोघा कर्मचाऱ्यांचा श्वास गुदमरून मृत्यू

वास्को : वेर्णा औद्योगिक वसाहतीतील सिप्ला कंपनीत रसायनाचा परिणाम होऊन बेशुद्ध पडलेल्या दोघा कर्मचाऱ्यांना मृत्यू येण्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. मयत कर्मचाऱ्यांची नावे अक्षय भिमराव पवार (24) व अक्षय विठ्ठल पाटील (27) अशी असून पवार हा सांगलीतील तर पाटील हा कोल्हापूरचा युवक आहे. ते कुठ्ठाळीतील कोन्सुआ भागात राहत होते. कंपनीतील एका प्लान्टमध्ये काम करताना ही […]

वेर्णातील कंपनीत दोघा कर्मचाऱ्यांचा श्वास गुदमरून मृत्यू

वास्को : वेर्णा औद्योगिक वसाहतीतील सिप्ला कंपनीत रसायनाचा परिणाम होऊन बेशुद्ध पडलेल्या दोघा कर्मचाऱ्यांना मृत्यू येण्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. मयत कर्मचाऱ्यांची नावे अक्षय भिमराव पवार (24) व अक्षय विठ्ठल पाटील (27) अशी असून पवार हा सांगलीतील तर पाटील हा कोल्हापूरचा युवक आहे. ते कुठ्ठाळीतील कोन्सुआ भागात राहत होते. कंपनीतील एका प्लान्टमध्ये काम करताना ही घटना घडली. वेर्णा पोलीस स्थानकातील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वेर्णातील सिप्ला या औषध उत्पादन कंपनीच्या प्लान्टमध्ये मयत युवक एन.जे. रिनीवेबल एनर्जी प्रा. लि. या आस्थापनासाठी काम करीत होते. ते संध्याकाळी चारच्या सुमारास कंपनीमध्ये एका मशिन दुरूस्तीच्या कामासाठी टाकीत उतरले होते. हे काम करताना ते बेशुद्ध पडले. रसायनाचा परिणाम होऊन त्यांचा श्वास गुदमरला व त्यामुळे ते बेशुध्द पडले असावे, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना उघडकीस येताच त्या दोघांना कंपनीच्या सहकाऱ्यांनी दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये आणले. परंतु डॉक्टरांनी त्यांना आधीच मृत्यू आल्याचे घोषित केले. वेर्णा पोलिसांनी या घटनेचा पंचनामा केलेला असून मृतदेह सध्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहेत. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केलेली असून पोलीस उपअधीक्षक सलीम शेख व पोलीस निरीक्षक मेल्सन कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली वेर्णा पोलीस अधिक तपास करीत आहेत.