धक्कादायक! तुळजाभवानीचे दागिने चोरीला, सोन्याचा मुकुटासह मंगळसूत्र गायब
Chattal Bhavani Shaktipeeth
तूळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या नित्योपचारातील दागिने गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुळजाभवानी देवीचा एक किलो वजनाचा प्राचीन सोन्याचा मुकूट गायब असल्याचे दागिने तपासणी समितीस दिसून आले आहे. तसा अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. यात केवळ मुकूटच नाही, तर तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात असलेल्या शेकडो वर्षे जुन्या दुर्मिळ दागिन्यांच्या वजनात कमालीची तफावत आढळून आली आहे. तसेच चोरी लपवण्यासाठी दुसरा मुकुट ठेवण्यात आला असून पुरातन पादुका काढून त्या नवीन बसविण्याचा पराक्रमही करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे खळबळ उडालीआहे.
मंदीर संस्थांनाने उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या 16 सदस्य समितीने दिलेल्या अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात तुळजाभवानी देवीच्या नित्योपचारासाठीच वापरण्यात येणारे सोन्या-चांदीचे दागिने, हिरे, मोती, माणिक, पाचू असे अनेक अलंकार मंदिराच्या तिजोरीतून गायब असल्याचेही उघडकीस आले आहे. या समितीने दोन महिन्यांपूर्वी अहवाल सादर केला आहे. या समितीने सादर केलेल्या अहवालातून तुळजाभवानी मंदिरातून वेगवेगळ्या 7 डब्यांमधील शेकडो वर्षांचा इतिहास असलेले अनेक दुर्मिळ आणि मौल्यवान दागिने गायब असल्याचे समोर आले आहे.
हे दागिने 300 ते 900 वर्षांपर्यंत जुने आहे. माहितीनुसार डबा क्र. 1 विशेषप्रसंगी वापरण्यात येतो. महत्त्वाच्या दिवशी या डब्यातील दागदागिन्यांचा साज तुळजाभवानी देवीला केला जातो. ज्यातील 27 प्राचीन अलंकारांपैकी चार अलंकार गायब असल्याचे समितीच्या अहवालात म्हटले आहे. शिवाय अनेक अलंकाराच्या वजनात कमालीची तफावत नोंदविण्यात आली आहे.
1976 पासून डबा क्र. 6 मधील अलंकार नित्योपचारासाठी वापरले जातात. त्यातील साखळीसह 12 पदरांच्या 11 पुतळ्या असलेले मंगळसूत्र व चांदीचा खडाव गहाळ झाले आहेत.
त्यापूर्वी नित्योपचारासाठी वापरण्यात आलेल्या डबा क्र. 3 मध्ये 826 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मूळ मुकुट गहाळ असल्याचा संशय समितीने व्यक्त केला आहे. तुळजाभवानी देवीच्या जुन्या फोटोंमध्ये असलेला मुकुट आणि सध्या आढळून आलेला मुकुट यात फरक असल्याचे सांगितले जात आहे. अशात प्राचीन मुकुट बदलून त्या ठिकाणी दुसरा मुकुट ठेवला असल्याची नोंद समितीने त्यांच्या अहवालात केली आहे. तसेच या डब्यातील एकूण 16 अलंकारांपैकी मंगळसूत्र, नेत्रजडावी, माणिकमोती हे 3 दुर्मिळ अलंकार गहाळ झाले आहेत.
तसेच डबा क्र. 5 मधील एकूण 10 अलंकारांपैकी एक अलंकार गायब, तर इतर दागिन्यांच्या वजनात तफावत असल्याचे नोंदविण्यात आले आहे. तर डबा क्र. 7 मधील एकूण 32 दुर्मिळ अलंकारांपैकी तुळजाभवानी देवीचा चांदीचा पुरातन मुकुट गायब असल्याचे आढळून आले आहे. इतर 31 दागिन्यांच्या वजनातही तफावत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
एक किलो 268 ग्रॅम वजनाची 289 सोन्यांच्या पुतळ्याची तीन पदरी शिवकालीन माळ तत्काळ दुरुस्त करण्याची शिफारस देखील समितीने केली. आता या प्रकरणात दोषी कोण हे ठरविण्यासाठी एक स्वतंत्र समिती काम करते आहे.