‘पंचमवेद’नाट्यामहोत्सवात त्रिविध आविष्कार

‘गोमंत विद्या निकेतन’ संस्थेतर्फे दरवर्षी ‘दामोदर काशिनाथ नायक’ यांच्या स्मृतिनिमित्त, ‘हा कंठ दाटूनी आला’ संगीतमय कार्यक्रम मडगाव : नाट्याशास्त्राला ‘पंचमवेद’ असे संबोधले जाते. ‘प्रयोग’ हाच त्याचा प्राण, त्याची ओळखदेखील. रंगमंचावर सादर केलेले जे काही असते त्यास ‘नाटक’ म्हणावे का ? हा प्रश्न सतत ऐरणीवर असतो. प्रघाताला वा परंपरेला छेद देणारे प्रयोग हे सर्वकाळ व सर्वदूर […]

‘पंचमवेद’नाट्यामहोत्सवात त्रिविध आविष्कार

‘गोमंत विद्या निकेतन’ संस्थेतर्फे दरवर्षी ‘दामोदर काशिनाथ नायक’ यांच्या स्मृतिनिमित्त, ‘हा कंठ दाटूनी आला’ संगीतमय कार्यक्रम
मडगाव : नाट्याशास्त्राला ‘पंचमवेद’ असे संबोधले जाते. ‘प्रयोग’ हाच त्याचा प्राण, त्याची ओळखदेखील. रंगमंचावर सादर केलेले जे काही असते त्यास ‘नाटक’ म्हणावे का ? हा प्रश्न सतत ऐरणीवर असतो. प्रघाताला वा परंपरेला छेद देणारे प्रयोग हे सर्वकाळ व सर्वदूर होतच आले आहेत. नाटकाचा विषय, भाषा, आकृतिबंध, अवधी, प्रयोजन अशा अनेक गोष्टींचा विचार करून अभ्यासक, टिकाकार व विश्लेषक ‘नाटकाचे प्रकार’ मानतात. परंतु रंगकर्मी हा त्यांच्या ‘नाट्याप्रकाराच्या’ यादीला सतत आव्हान देत असतो, वैयक्तिक व सामूहिक अभिव्यक्तीचे अनवट मार्ग शोधत असतो. अशा नाटकांना गोव्याच्या प्रेक्षकांसमोर आणण्याच्या उद्देशानेच ‘गोमंत विद्या निकेतन’ ही संस्था दरवर्षी ‘दामोदर काशिनाथ नायक’ यांच्या स्मृतिनिमित्त ‘पंचमवेद’ हा नाट्यामहोत्सव घडवून आणते.
यंदाच्या ‘पंचमवेद’ नाट्यामहोत्सवात तीन वेगवेगळ्या प्रकारचे आविष्कार पहायला मिळाले. पहिल्या दिवशी ‘हा कंठ दाटूनी आला’ हा ना. धो. महानोर यांच्या कवितांवर आधारित संगीतमय कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात महानोरांच्या कवितांबरोबर अहिराणी भाषा, खानदेशी संस्कृती, त्या प्रदेशाचा सांस्कृतिक इतिहास व नाट्या, साहित्य आणि इतर कलाक्षेत्रातील कार्य यांची ओळख झाली. ओघवते निरूपण,  लोकसंगीताचा उतम वापर, कवितांचे अर्थपूर्ण वाचन यांनी परिपूर्ण अशा या सादरीकरणाचे वैशिष्ट्या असे की, त्यात असलेला नैसर्गिक ओलावा ! नारायण बावीस्कर यांच्या संकल्पनेचे दिग्दर्शन केले होते हर्षल पाटील यांनी.
दुसऱ्या दिवशी मोहन राकेश लिखित ‘आधे अधुरे’ या हिंदी नाटकाचा मराठी आविष्कार, ‘अपूर्णांक’ सादर करण्यात आला. शंभू पाटील यांनी अनुवादित केलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन नारायण बावीस्कर यांनी केले होते. मंजुषा भिडे, राहुल निंबाळकर, प्रतीक्षा कल्पराज, मोना निंबाळकर व शंभू पाटील या कलाकारांनी यातील पात्रे जिवंत केली. आजतागायत हे नाटक अनेक दिग्दर्शकांनी अनेक भाषांमध्ये अनेक पद्धतीत सादर केले आहे. लिहितानाच नाटककाराने बऱ्याच गोष्टी सादरकर्त्यावर सोडून दिल्या आहेत. आणि याच कारणाने ते नाटक सर्व रंगकर्मींना आजही खुणावत असते. चोख प्रयोग !
वरील दोन्ही सादरीकरणे जळगावच्या ‘परिवर्तन’ या संस्थेने केली. 2011 साली स्थापन झालेली ही संस्था भाषा-प्रांत यापलिकडे जाऊन साहित्य, नाट्या, संगीत, नृत्य अशा विविध कला माध्यमातून आपली मुळं शोधण्याच्या शोधयात्रेला निघाली आहे. तिसऱ्या दिवशी ‘तुजी औकात काय’ हा बहाद्दर प्रयोग पहायला मिळाला ! वेदिका कुमारस्वामी यांचा ‘गावनवरी’ या पुस्तकावर आधारित एका देखण्या आविष्काराची मेजवानी प्रेक्षकांना पहायला मिळाली. एका देवदासी परंपरेतल्या वेदिकाची ही कहाणी. देवाशी विवाह करून दिलेली वेदिका घटस्फोट घेते, देवी-देवतांच्या रूढ अस्तित्वावर भाष्य करते. तिच्या प्रवासाची ही कहाणी.
नाटक म्हटल्यावर डोळ्यासमोर येणारी रंगमंचाची मांडावळ, पात्रांच्या हालचाली, अभिनय, प्रसंगांची रेलचेल अशा सर्व कल्पनांना फाटा देऊन केवळ  संगीत, गाणी व संवाद यांचा परिणामकारक वापर करून हे नाट्या उभे राहिले. बरं, सगळी गाणी तरी मराठीत होती का ? तर नाही, पाच कानडी, एक मराठी, एक हिंदी ! नांदीच कानडी भाषेतली ! त्या अमराठी गाण्यांचा अर्थ शब्दातून नसेल पण सूर व लय यांच्या माध्यमातून तो पुरेपूर  पोहोचत राहिला. या नाटकाचे रूपांतर  व दिग्दर्शन प्रतीक्षा कारखानीस व निकिता ठुबे यांनी केले होते तर संगीत  दिप डबरे व स्वप्नील  भावे यांनी. कल्पेश समेळ  यांचा  या सादरीकरणात महत्वाचा वाटा होता. हे पाचही कलाकार रंगमंचावर बसून वेदिकेची कथा आवेशपूर्ण मांडतात. ‘सोशल रंगमंच’ या संस्थेने जो काही अनुभव दिला तो सर्वार्थाने जगावेगळा होता यात शंका नाही.