बेनकनहळ्ळी येथील धान्य गोदामासमोर वाहतूक कोंडी

ट्रक इतरत्र पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी वार्ताहर /उचगाव बेळगाव-बेळगुंदी-राकसकोप या मार्गावरील बेनकनहळ्ळी येथील धान्य गोदामामध्ये धान्य ठेवण्यासाठी आणि तेथून धान्याची पुन्हा उचल करण्यासाठी रोज ये-जा करणारे ट्रक रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग करत असल्याने जवळपास दोनशे मीटर अंतराच्या रस्त्यावरून एकेरी वाहतूक होत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून, ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत […]

बेनकनहळ्ळी येथील धान्य गोदामासमोर वाहतूक कोंडी

ट्रक इतरत्र पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
बेळगाव-बेळगुंदी-राकसकोप या मार्गावरील बेनकनहळ्ळी येथील धान्य गोदामामध्ये धान्य ठेवण्यासाठी आणि तेथून धान्याची पुन्हा उचल करण्यासाठी रोज ये-जा करणारे ट्रक रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग करत असल्याने जवळपास दोनशे मीटर अंतराच्या रस्त्यावरून एकेरी वाहतूक होत आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून, ये-जा करणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. शिवाय सदर ठिकाणी अपघातही घडत आहेत. तरी संबंधित खात्याने सदर ट्रकची इतरत्र पार्किंगची व्यवस्था करावी, अशी मागणी प्रवासी आणि या भागातील नागरिकांतून करण्यात येत आहे. बेनकनहळ्ळी येथे शासकीय धान्य गोदाम आहे. या गोदामामध्ये धान्यसाठा केला जातो. व ज्या ज्या ठिकाणी धान्य पुरवठा करण्यात येतो तो याच गोदामातून पुन्हा पाठविला जातो. सदर मार्गावरून रोज हजारो प्रवाशांची वाहतूक सुरू असते. रस्ता कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रमधील तुडये भागातील नागरिकांचीही याच मार्गे बेळगावला ये-जा असते. राकसकोप धरणाकडे ये-जा करणारे अनेक प्रवासी, पर्यटकांची याच रस्त्यावरून ये-जा असल्याने रस्त्यावर नेहमी रहदारी असते. धान्य गोदामालगत रस्त्याच्या एका बाजूला जवळपास 20 ते 25 ट्रक एका लाईनमध्ये उभे असतात. परिणामी या ठिकाणी एकेरी वाहतूक होत असल्याने प्रवासी वर्गाची बरीच गैरसोय होते आहे.
एकेरी वाहतुकीमुळे गैरसोय
एकेरी वाहतुकीमुळे एका बाजूने आलेले प्रवासी पूर्ण 200 मीटर अंतराचा रस्ता पार केल्यानंतर दुसऱ्या बाजूने वाहने जाण्यास प्रारंभ करतात. तरी शासनाने व धान्य गोदाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी थांबत असलेल्या ट्रकची इतरत्र पार्किंगसाठी व्यवस्था करावी आणि सदर रस्ता नेहमी रहदारीसाठी खुला ठेवावा, अशी मागणी या भागातील नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे.