एक्स्प्रेस थांबल्याने वाहतूक कोंडी

दुसऱ्या रेल्वेगेटवर चन्नम्मा एक्स्प्रेस 10 मिनिटे थांबल्याने विद्यार्थी-कामगारांची मोठी गर्दी बेळगाव : टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेट म्हणजे नेहमीच वर्दळीचे ठिकाण. केवळ दोन मिनिटे रेल्वेगेट बंद राहिले तरी दोन्ही बाजूंना तुफान वाहतूक कोंडी होते. त्यातच मंगळवारी सकाळी चन्नम्मा एक्स्प्रेस तब्बल 10 मिनिटे थांबल्याने शालेय विद्यार्थी, तसेच कामगारांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे रेल्वेगेट दरम्यान एक्स्प्रेस थांबवू […]

एक्स्प्रेस थांबल्याने वाहतूक कोंडी

दुसऱ्या रेल्वेगेटवर चन्नम्मा एक्स्प्रेस 10 मिनिटे थांबल्याने विद्यार्थी-कामगारांची मोठी गर्दी
बेळगाव : टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेट म्हणजे नेहमीच वर्दळीचे ठिकाण. केवळ दोन मिनिटे रेल्वेगेट बंद राहिले तरी दोन्ही बाजूंना तुफान वाहतूक कोंडी होते. त्यातच मंगळवारी सकाळी चन्नम्मा एक्स्प्रेस तब्बल 10 मिनिटे थांबल्याने शालेय विद्यार्थी, तसेच कामगारांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे रेल्वेगेट दरम्यान एक्स्प्रेस थांबवू नयेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. बेंगळूर-मिरज दरम्यान धावणारी चन्नम्मा एक्स्प्रेस मंगळवारी तब्बल 45 मिनिटे उशिराने बेळगावमध्ये दाखल झाली. बेळगाव रेल्वेस्थानकातून सिग्नल न मिळाल्याने एक्स्प्रेस काहीकाळ टिळकवाडी येथील दुसरे रेल्वेगेट येथे थांबविण्यात आली. सकाळी 9.40 वाजता रेल्वेगेटजवळ थांबवलेली चन्नम्मा एक्स्प्रेस 10 मिनिटे तेथेच होती. रेल्वेगेट बंद राहिल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळच्या सत्रात शाळा, महाविद्यालये, कार्यालयीन कर्मचाऱ्यांची ये-जा असल्याने या सर्वांनाच काहीकाळ थांबावे लागले. असे प्रकार वरचेवर घडत असून रेल्वेगेट दरम्यान एक्स्प्रेस थांबवू नयेत, अशी मागणी होत आहे.
बेळगावच्या नागरिकांना नाहक मनस्ताप
बेळगाव रेल्वेस्थानकात पार्किंगसाठी येणाऱ्या एक्स्प्रेसची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्र. 1, 2 व 3 वगळता इतर प्लॅटफॉर्मवर सकाळी दाखल झालेल्या एक्स्प्रेस स्थानकात थांबलेल्या असतात. जोवर रेल्वेस्थानकातून सिग्नल मिळत नाही तोवर एक्स्प्रेस रेल्वेस्थानकात येत नाहीत. सिग्नल न मिळाल्यास बेंगळूरच्या दिशेने येणाऱ्या एक्स्प्रेस दुसरे रेल्वेगेट परिसरात थांबविल्या जात आहेत. परंतु यामुळे बेळगावच्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.