दोन्ही मार्केटमध्ये समन्वयाने व्यवहार करा

पालकमंत्री सतीश जारकीहोळी : एपीएमसी-जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बेळगाव : मार्केट यार्ड येथील एपीएमसी आणि गांधीनगर येथील जय किसान भाजी मार्केट ही दोन्ही मार्केट सुरळीत चालावीत, शिवाय कोणत्याही परिस्थितीत कोट्यावधी रुपये खर्चून उभे केलेले एपीएमसी मार्केट बंद पडू देणार नाही, जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी […]

दोन्ही मार्केटमध्ये समन्वयाने व्यवहार करा

पालकमंत्री सतीश जारकीहोळी : एपीएमसी-जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
बेळगाव : मार्केट यार्ड येथील एपीएमसी आणि गांधीनगर येथील जय किसान भाजी मार्केट ही दोन्ही मार्केट सुरळीत चालावीत, शिवाय कोणत्याही परिस्थितीत कोट्यावधी रुपये खर्चून उभे केलेले एपीएमसी मार्केट बंद पडू देणार नाही, जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एपीएमसी आणि जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीत दोन्ही मार्केटच्या पदाधिकाऱ्यांची मते समजून घेऊन तोडगा काढण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिवाय दोन्ही व्यापारी संघटनांपैकी एका संघटनेने सकाळी तर दुसऱ्या संघटनेने दुपारच्या सत्रात व्यापार करावा, याबाबतही चर्चा करण्यात आली. शिवाय सविस्तर चर्चा करण्यासाठी पुढील महिन्यात बैठक बोलाविण्यात आली आहे.
जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य करावे
एपीएमसी येथे कोट्यावधी रुपये खर्चून सुसज्ज भाजी मार्केट उभारण्यात आले आहे. मात्र, या ठिकाणी व्यापार कमी झाला आहे. त्यामुळे व्यापारी, दलाल आणि गाळेधारक अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्याची भावना दाखवावी, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.
वेळेत खरेदी-विक्री आवश्यक
या बैठकीत एपीएमसी व जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. शेतकरी, दलाल, व्यापारी आणि गाळेधारक या सर्वांचा व्यवहार सुरळीत चालण्यासाठी योग्य निर्णय घेतला जाईल, याबाबतही मंत्र्यांनी माहिती दिली. मार्केट यार्ड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने सकाळी 8 ते 12 यावेळेत आणि गांधीनगर येथील जय किसान भाजी मार्केटने दुपारच्या वेळेत व्यापार करावा, याबाबत चर्चा झाली. मात्र, याला काही व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला. सकाळच्या सत्रात आलेला शेतीमाल सायंकाळी लिलाव करणे अडचणीचे आहे. शेतीमाल खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीमाल वेळेत लिलाव करणे आणि खरेदी-विक्री करणे
आवश्यक असल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.
बैठकीला आमदार राजू सेठ, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील, एपीएमसी सचिव गुरुप्रसाद यांसह दोन्ही भाजी मार्केटचे पदाधिकारी, व्यापारी, गाळेधारक आणि शेतकरी उपस्थित होते.
सर्वांच्या हितासाठी योग्य निर्णय घेणे गरजेचे
शहराचा विस्तार वाढू लागला आहे. त्यामुळे भाजीपाला आणि इतर शेतीमालाची मागणी वाढू लागली आहे. अशा परिस्थितीत व्यापारी, दलाल, शेतकरी आणि गाळेधारकांच्या हितासाठी योग्य निर्णय घेतला पाहिजेत, असे मतही महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.