चालुक्य एक्स्प्रेसमध्ये थरार

  बेळगाव : धावत्या रेल्वेत एका माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात उत्तर प्रदेशमधील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर टीसीसह अन्य चौघे जण जखमी झाले आहेत. गुरुवार दि. 16 मे रोजी सायंकाळी लोंढा ते खानापूर दरम्यान चालुक्य एक्स्प्रेसमध्ये हा थरार घडला आहे. या घटनेने रेल्वेप्रवासी हादरून गेले आहेत. पुदुच्चेरी-मुंबई चालुक्य एक्स्प्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका माथेफिरुने […]

चालुक्य एक्स्प्रेसमध्ये थरार

 
बेळगाव : धावत्या रेल्वेत एका माथेफिरुने केलेल्या चाकू हल्ल्यात उत्तर प्रदेशमधील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर टीसीसह अन्य चौघे जण जखमी झाले आहेत. गुरुवार दि. 16 मे रोजी सायंकाळी लोंढा ते खानापूर दरम्यान चालुक्य एक्स्प्रेसमध्ये हा थरार घडला आहे. या घटनेने रेल्वेप्रवासी हादरून गेले आहेत. पुदुच्चेरी-मुंबई चालुक्य एक्स्प्रेसमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या एका माथेफिरुने हे कृत्य केले आहे. या घटनेनंतर चाकू हल्ला करणारा हल्लेखोर खानापूरजवळ रेल्वेतून उतरून निघून गेला आहे, अशी माहिती मिळाली आहे. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात रात्री उशिरापर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. देवर्षी पोनुनारायण वर्मा (वय 25) रा. शेषा, जि. झांशी, उत्तरप्रदेश असे चाकू हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव असून तो स्वच्छता कर्मचारी होता, अशी माहिती मिळाली आहे. टीसी अश्रफअली कित्तूर (वय 27) रा. जुने हुबळी, महम्मद सोहेल (वय 23) रा. गदिना, जि. प्रयागराज, उत्तरप्रदेश, सतीश गणपती बेंदरे (वय 31) रा. फुलबाग गल्ली, बेळगाव अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. चाकू हल्ल्यातील गंभीर जखमी देवर्षी वर्मा या तरुणाच्या छातीत वर्मी घाव बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. तर टीसी अश्रफअली यांच्या हाताला इजा पोहोचली आहे. या घटनेची माहिती समजताच पोलीस व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला धाव घेतली.
पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, मार्केटचे एसीपी सोमेगौडा जी. यु., एपीएमसीचे पोलीस निरीक्षक खाजा हुसेन यांच्यासह आरपीएफचे अधिकारीही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. जखमींची भेट घेऊन पोलीस आयुक्तांनी त्यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले, धावत्या रेल्वेत चाकू हल्ला झाला आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हल्लेखोर विनातिकीट प्रवास करीत होता. त्याच्याविषयी माहिती मिळाली आहे. त्याचा शोध घेण्यात येत आहे. उपलब्ध माहितीनुसार पुदुचेरी-मुंबई चालुक्य एक्स्प्रेस बुधवारी रात्री पुदुचेरीहून निघाली होती. गुरुवारी दुपारी 3.30 वाजता ही रेल्वे लोंढा येथे पोहोचली. लोंढा रेल्वेस्थानकावरून रेल्वे सुटल्यानंतर एस-8 या स्लीपर कोचमध्ये एक तरुण उभा होता. टीसीने त्याच्याकडे तिकिटाची विचारणा केली. त्याच्याजवळ तिकीट नव्हते. दुसऱ्या डब्यात असलेल्या सहकाऱ्याकडे तिकीट आहे, असे त्याने सांगितले. टीसीने त्याचे हात पकडून दुसऱ्या डब्याकडे चल म्हणताच आपल्याजवळील चाकू काढून त्याने टीसीवर हल्ला केला. तो चुकविण्यासाठी हात पुढे केल्याने त्यांच्या हाताला इजा पोहोचली. याचवेळी देवर्षी तेथे होता. त्याने ‘टीसीवर हल्ला का केलास?’ असे विचारताच अज्ञात हल्लेखोराने चाकूने त्याच्या छातीत वार केला. त्यानंतर दिसेल त्याच्यावर हल्ला करत तो सुटला. या घटनेने एस-8 स्लीपर कोचमध्ये एकच गोंधळ उडाला. जखमीत काही कर्मचारीही आहेत. ही रेल्वे बेळगावला आल्यानंतर तातडीने सर्व जखमींना सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले. तोपर्यंत देवर्षीचा मृत्यू झाला होता. या घटनेने रेल्वेप्रवासी हादरून गेले आहेत.
हल्लेखोराला लाथ मारून स्वत:ची सुटका
कँटीनमध्ये काम करणारा शिवानंद दिंडलकुप्पी (वय 25) रा. खनगाव हा तरुण याच रेल्वेमध्ये बेळगावला येत होता. अज्ञात हल्लेखोराने शिवानंदच्या दिशेनेही चाकू उगारला. हल्लेखोराला लाथ मारून शिवानंदने स्वत:ची सुटका करून घेतली. सिव्हिलजवळ घडला प्रकार या तरुणाने पत्रकारांना सांगितला. हल्लेखोराला लाथ मारली नसती तर माझ्या छातीतही त्याने चाकू घुसवला असता, असेही त्याने सांगितले.
बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकाशकुमार विकाश, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी सायंकाळी खानापूरला धाव घेतली. खानापूर रेल्वेस्थानकावर तब्बल अर्धा तासाहून अधिक काळ पाहणी करून त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. खानापूरचे पोलीस निरीक्षक रामचंद्र नायक हेही यावेळी उपस्थित होते.
‘त्या’ माथेफिरूचा शोध सुरू
धावत्या रेल्वेत चाकू हल्ला करणारा माथेफिरू कोण? तो कोठून आला आहे? कोठे जात होता? केवळ तिकीटाची विचारणा केल्यामुळे त्याने टीसीसह अन्य चौघांवर हल्ला केला का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी बेळगाव शहर, जिल्हा, रेल्वे पोलीस कामाला लागले आहेत. खानापूरनजीक रेल्वेचा वेग कमी झाल्यावर हल्लेखोर पसार झाला असावा, असा संशय आहे. त्याचा शोध घेण्यासाठी रेल्वे पोलिसांचे एक पथक रात्री उशिरापर्यंत खानापूर परिसरात प्रयत्नात होते. जर धावत्या रेल्वेतून त्याने उडी टाकली असेल तर त्याचे जगणेही मुश्कील आहे. हा अंदाज गृहित धरून रेल्वेट्रॅकवरही शोध घेण्यात येत होता.