दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये भारताचा रोमांचक विजय

अफगाणची झुंजार लढत, बिश्नोई ठरला हिरो, भारताकडून अफगाणचा 3-0 व्हाईटवॉश रोहित शर्मा सामनावीर, शिवम दुबे मालिकावीर वृत्तसंस्था/ बेंगळूर अतिशय रोमांचक ठरलेल्या तिसऱ्या व शेवटच्या टी-20 सामन्यात भारताने दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये अफगाणचा पराभव करून तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. रोहित शर्माला सामनावीर तर शिवम दुबेला मालिकावीर पुरस्कार मिळाला. रोहित शर्माचे नाबाद शतक (69 चेंडूत 11 […]

दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये भारताचा रोमांचक विजय

अफगाणची झुंजार लढत, बिश्नोई ठरला हिरो, भारताकडून अफगाणचा 3-0 व्हाईटवॉश
रोहित शर्मा सामनावीर, शिवम दुबे मालिकावीर
वृत्तसंस्था/ बेंगळूर
अतिशय रोमांचक ठरलेल्या तिसऱ्या व शेवटच्या टी-20 सामन्यात भारताने दुसऱ्या सुपरओव्हरमध्ये अफगाणचा पराभव करून तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी एकतर्फी जिंकली. रोहित शर्माला सामनावीर तर शिवम दुबेला मालिकावीर पुरस्कार मिळाला.
रोहित शर्माचे नाबाद शतक (69 चेंडूत 11 चौकार व 8 षटकारासह नाबाद 121) व रिंकू सिंग (नाबाद 69) यांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 4 बाद 212 धावा केल्या. या दोघांनी 190 धावांची विक्रमी भागीदारी नोंदवली. त्यानंतर अफगाणनेही 20 षटकांत 6 बाद 212 धावा जमविल्याने सामना टाय झाला. पहिल्या सुपरओव्हरमध्ये अफगाणने 16 धावा जमविल्या. त्यानंतर भारतानेही 16 धावाच जमविल्याने पुन्हा दुसरी सुपर ओव्हर घेण्यात आली. त्यात भारताने 1 बाद 11 धावा जमविल्या. पण बिश्नोईने टाकलेल्या षटकात अफगाणचे एका धावेत दोन फलंदाज बाद झाल्याने भारत विजयी झाले.
तत्पूर्वी, भारत 4 बाद 22 अशा संकटात असताना रोहित व रिंकूने शानदार खेळी साकारताना अफगाण गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
प्रारंभी, टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, टीम इंडियाची सुरुवातच खराब झाली. या सामन्यातील भारतीय संघाला बसलेला पहिला झटका यशस्वी जैस्वालच्या रुपात होता. जैस्वालने 6 चेंडूत अवघ्या 4 धावा करून विकेट गमावली. यानंतर आलेला विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोल्डन डक म्हणजे पहिल्या चेंडूवर शुन्यावर बाद होण्याची ही विराटची पहिलीच वेळ आहे.
मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये शिवम दुबे भारतासाठी मॅच विनर ठरला होता. पण या चिन्नास्वामी स्टेडियमवर दुबे 6 चेंडूत 1 धाव करून बाद झाला. याशिवाय, संजू
सॅमसन याला पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये बाहेर बसावे लागले होते. पण तिसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळून देखील सॅमसनला संघासाठी योगदान देता आले नाही.
सॅमसन देखील विराटप्रमाणेच गोल्डन डकवर बाद झाला. संघाची धावसंख्या अवघी 22 असताना भारताने  या चार महत्वाच्या विकेट्स गमावल्या. यातील जैस्वाल, विराट आणि सॅमसन यांना एकट्या फरीद अहमदने तंबूत धाडले.
रोहितचे नाबाद शतक, रिंकूचीही तुफानी फटकेबाजी
4 बाद 22 अशा बिकट स्थितीतून कर्णधार रोहित शर्मा व रिंकू सिंग यांनी भारताचा डाव सावरला. रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी पाचव्या विकेटसाठी दीडशतकी भागिदारी केली. दोघांच्या भागिदारीच्या जोरावर भारताने द्विशतकी धावसंख्या उभारली. रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली, त्यानंतर अफगाण गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. रोहित आणि रिंकू यांच्यामध्ये पाचव्या विकेटसाठी 190 धावांची भागिदारी झाली.
पहिल्या दोन्ही सामन्यात रोहित शर्माला खातेही उघडता आले नव्हते. पण या सामन्यात मात्र रोहितने अनुभव पणाला लावत अफगाण गोलंदाजांची धुलाई केली. रोहितने 69 चेंडूमध्ये 11 चौकार व 8 षटकारासह नाबाद 121 धावांची खेळी केली. रिंकू सिंगने त्याला चांगली साथ देताना 39 चेंडूत 2 चौकार व 6 षटकारासह नाबाद 69 धावा केल्या.
सुरुवातीला रिंकूने संयमी खेळी केली पण नंतर खेळपट्टीचा अंदाज आल्यानंतर त्याने नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करताना नाबाद 69 धावांची महत्वपूर्ण खेळी
केली. विशेष म्हणजे, शेवटच्या पाच षटकात भारताने एकही विकेट न गमावता 103 धावा केल्या.
रोहित व रिंकूच्या या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकांत 4 बाद 212 धावा केल्या. अफगाण संघाकडून फरीद अहमदने 3 तर उमरझाईने 1 विकेट घेतली.
रोहितचे विक्रमी पाचवे टी-20 शतक, अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
कठीण परिस्थितीमध्ये रोहित शर्माने आक्रमक फलंदाजी केली. पहिल्या दोन्ही सामन्यात रोहितला खातेही उघडता आले नव्हते. पण चिन्नास्वामी स्टेडिमयवर मात्र हिटमॅनने अनुभव पणाला लावत अफगाण गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारतीय कर्णधाराने 69 चेंडूमध्ये नाबाद 121 धावांची खेळी केली. विशेष म्हणजे, रोहितचे हे आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधील पाचवे शतक ठरले. टी-20 क्रिकेटमध्ये पाच शतके ठोकणारा तो पहिलाच खेळाडू आहे. याआधी असा पराक्रम एकाही फलंदाजाला करता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकांत 4 बाद (रोहित शर्मा 69 चेंडूत नाबाद 121, यशस्वी जैस्वाल 4, विराट कोहली 0, शिवम दुबे 1, संजू
सॅमसन 0, रिंकू सिंग 39 चेंडूत नाबाद 69, फरीद अहमद 20 धावांत 3 बळी, उमरझाई 1 बळी).
अफगाण 20 षटकांत 6 बाद 212 : गुरबाज 32 चेंडूत 50, इब्राहिम झद्रन 41 चेंडूत 50, गुलबदिन नईब 23 चेंडूत नाबाद 55, मोहम्मद नबी 16 चेंडूत 34. वॉशिंग्टन सुंदर 3-18, आवेश खान 1-55, कुलदीप यादव 1-31.
सुपरओव्हर 1 : अफगाण 1 बाद 16, भारत बिनबाद 16
सुपरओव्हर 2: भारत 2 बाद 11, अफगाण 2 बाद 1.