Sangli News | फाळकेवाडीत उसाच्या आगीत तीन बिबट्या बछड्यांचा होरपळून मृत्यू

                                  लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे घडली दुर्घटना बागणी -फाळकेवाडी येथील अनिल तेरदाळे यांच्या उसाच्या फडात लपलेल्या मादी बिबट्याच्या तीन निरागस बछड्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेमुळे परिसरातून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्रचिन्ह उपस्थित केले जात असून निसर्ग प्रेमी […]

Sangli News | फाळकेवाडीत उसाच्या आगीत तीन बिबट्या बछड्यांचा होरपळून मृत्यू

                                  लोंबकळणाऱ्या विद्युत तारांमुळे घडली दुर्घटना
बागणी -फाळकेवाडी येथील अनिल तेरदाळे यांच्या उसाच्या फडात लपलेल्या मादी बिबट्याच्या तीन निरागस बछड्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेमुळे परिसरातून वनविभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्रचिन्ह उपस्थित केले जात असून निसर्ग प्रेमी व वन्यजीव प्रेमी यांच्यामधून संताप व्यक्त केला जात आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीवरून नागाव रोड जोतिबा पावदका मंदिरा नजिक असलेल्या तेरदाळे यांच्या उसाच्या फडात मादी बिबट्याने आपल्या तीन बछड्यांना सुरक्षिततेसाठी लपवून ठेवले होते. मात्र शेतावरून गेलेल्या विद्युत तारांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने उसाला अचानक आग लागली. बाळलेल्या पाचटामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने बछड्यांना पळ काढण्यासाठी संधी न मिळाल्याने दोन बछड्यांचा जागीच मृत्यू झाला तर एका बछड्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपल्या पिल्लांच्या मृत्यूमुळे बिथरलेली मादी बिबट्या परिसरात डरकाळी फोडत फिरत आहे. पिल्लांच्या मृत्यूमुळे ही मादी अधिक हिंसक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. काही दिवसांपूर्वीच फाळकेवाडीतील जाधव यांच्या उसाच्या फडात पांढऱ्या रंगाच्या बछड्याचे दर्शन झाले होते. त्याचा रंग पांढरा असल्याने तो कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय ठरला होता.
वनविभागानेही याची दखल घेऊन त्याभागात देखरेख वाढवली होती. मात्र याला ट्रॅक करणे आवश्यक होते. याच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून अशा दुर्मिळ पांढऱ्या बिबट्याच्या पिल्लास सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते पण वनविभागाच्या अधिकायांनी असे केल्याचे निदर्शनास येत नाही. वनविभाग दुर्मिळ प्राण्यांच संगोपन करण्यास कमी पडत आहे.
मादी बिबट्याचा वावर
बछड्यांच्या मृत्यूमुळे परिसरात मादी बिबट्याचा वावर असल्याचा अंदाज वनविभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तरीही नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वनविभागाकडून वेळोवेळी भागात रेस्क्यू ऑपरेशन राबण्यात येत आहे.
भिवा कोळेकर वनरक्षक विद्युत तारांमुळे दुर्घटना
लोंबकळाणाऱ्या विद्युत तारांमुळे ही दुर्घटना घडल्याने महावितरण विभागाचा निष्काळजीपणा उघड झाला असून महावितरण विभागावरही कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.