नंदगड रथोत्सवाला हजारो भाविकांची उपस्थिती

वार्ताहर /नंदगड नंदगड व परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत विरक्त मठाचा रथोत्सव पार पडला. यावेळी हर हर महादेवाचा गजर भाविकांकडून होत होता. शांततेत व सुव्यवस्थित रथोत्सव पार पडला. शुक्रवारी सायंकाळी नंदगड गावातील नागरिक मठासमोरील रथाजवळ जमा झाले. मठाचे उत्तराधिकारी चन्नवीर देवरु यांच्या हस्ते मठाचे पूजन झाले. त्यानंतर हक्कदारानी श्रीफळ वाढवून रथोत्सवाला सुरुवात झाली. दगडी रथ फुलांनी […]

नंदगड रथोत्सवाला हजारो भाविकांची उपस्थिती

वार्ताहर /नंदगड
नंदगड व परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थितीत विरक्त मठाचा रथोत्सव पार पडला. यावेळी हर हर महादेवाचा गजर भाविकांकडून होत होता. शांततेत व सुव्यवस्थित रथोत्सव पार पडला. शुक्रवारी सायंकाळी नंदगड गावातील नागरिक मठासमोरील रथाजवळ जमा झाले. मठाचे उत्तराधिकारी चन्नवीर देवरु यांच्या हस्ते मठाचे पूजन झाले. त्यानंतर हक्कदारानी श्रीफळ वाढवून रथोत्सवाला सुरुवात झाली. दगडी रथ फुलांनी सजविण्यात आला होता. फुलांच्या सजावटीसाठी दावणगिरीहून लोक आणण्यात आले होते. विधीवत धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर रथ ओढण्याला सुरुवात झाली. रथावर भाविकांकडून खडीसाखर, खारीक व केळी उडविण्यात येत होती. मठापासून नियोजित स्थळापर्यंत रथ ओढण्यात आला. रथोत्सवासाठी आबालवृद्ध व महिलांची संख्या लक्षणीय होती. गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या विरक्त मठ यात्रेला अनेक भाविकांनी उपस्थिती दर्शवून चन्नवीर स्वामीच्या पिठाचे दर्शन घेतले. शुक्रवारी रथोत्सव असल्याने रथापासून मठाच्या परिसरात गर्दी झाली होती. रथोत्सवानंतर भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी अनेक मठांचे मठाधिश उपस्थित होते.