तरुणाईला थर्टीफर्स्टचे वेध

ओल्डमॅनबरोबरच पार्ट्यांच्या नियोजनाला वेग बेळगाव : 31 डिसेंबर चार दिवसांवर येऊन ठेपल्याने तरुणाईला थर्टीफर्स्टचे वेध लागले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी यादिवशी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यामुळे 31 डिसेंबर उत्साहात साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. त्याचबरोबर शहर परिसरात ओल्डमॅनच्या तयारीत बालचमू दंग झाले आहेत. विशेषत: यादिवशी सर्व हॉटेल, रेस्टॉरंट फुल्ल […]

तरुणाईला थर्टीफर्स्टचे वेध

ओल्डमॅनबरोबरच पार्ट्यांच्या नियोजनाला वेग
बेळगाव : 31 डिसेंबर चार दिवसांवर येऊन ठेपल्याने तरुणाईला थर्टीफर्स्टचे वेध लागले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी यादिवशी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यामुळे 31 डिसेंबर उत्साहात साजरा करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. त्याचबरोबर शहर परिसरात ओल्डमॅनच्या तयारीत बालचमू दंग झाले आहेत. विशेषत: यादिवशी सर्व हॉटेल, रेस्टॉरंट फुल्ल असतात. त्यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्सनीदेखील विशेष पॅकेज व्यवस्था ठेवली आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर हॉटेल सजली आहेत. सध्या मोठ्या पंचतारांकित हॉटेलपासून साध्या हॉटेल्सनाही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. त्यामुळे पोलिसांची नजर चुकवून पार्टी करण्यासाठी तरुणांची धडपड राहणार आहे. सध्या मार्गशीर्ष सुरू असल्याने मांसाहाराची विक्री थंडावली आहे. मात्र 31 डिसेंबर रविवारी मांसाहाराची मागणी वाढणार आहे. विशेषत: मटण, चिकनची मोठ्या प्रमाणात खरेदी होणार आहे. सोशल मीडियावर आतापासूनच नववर्षाच्या स्वागताच्या तयारीबाबत चर्चा सुरू झाली आहे. शाकाहारी, मांसाहारी आणि इतर मेनूवर सवलती व पॅकेज देऊन ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न हॉटेल व्यावसायिकांचा आहे. काही युवकांकडून मद्यप्राशन करण्याबरोबरच स्टंटबाजी आणि हुल्लडबाजी केली जाते, अशांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार आहे.