‘त्या’ तेरा जणांना साडेतीन वर्षे कारावास

वरिष्ठ अधिकाऱ्याला खोट्या विनयभंगात गोवले : प्रत्येकी 86 हजारांचा दंड बेळगाव : हेस्कॉमच्या मुख्य कार्यकारी अभियंत्याला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या महिला अधिकाऱ्यासह तेरा जणांना 3 वर्षे 6 महिने कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा मुख्य सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एल. विजयलक्ष्मीदेवी यांनी हा निकाल दिला आहे. याबरोबरच प्रत्येकी 86 हजार रुपये दंडाचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात खळबळ माजलेल्या आपल्याच कनिष्ठ अधिकाऱ्यांनी […]

‘त्या’ तेरा जणांना साडेतीन वर्षे कारावास

वरिष्ठ अधिकाऱ्याला खोट्या विनयभंगात गोवले : प्रत्येकी 86 हजारांचा दंड
बेळगाव : हेस्कॉमच्या मुख्य कार्यकारी अभियंत्याला विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या महिला अधिकाऱ्यासह तेरा जणांना 3 वर्षे 6 महिने कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा मुख्य सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एल. विजयलक्ष्मीदेवी यांनी हा निकाल दिला आहे. याबरोबरच प्रत्येकी 86 हजार रुपये दंडाचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात खळबळ माजलेल्या आपल्याच कनिष्ठ अधिकाऱ्यांनी वरिष्ठांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडचणीत आणणाऱ्या या प्रकरणाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. प्रदीर्घ सुनावणीनंतर मंगळवार दि. 25 जून रोजी न्यायालयाने सर्व तेरा आरोपींना दोषी ठरवले होते. गुरुवारी दुपारी या खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला.
साहाय्यक अभियंत्या बी. व्ही. सिंधू, नाथाजी पाटील, अजित पुजारी, मलसर्ज शहापूरकर, सुभाष हल्लोळ्ळी, इराप्पा पत्तार, मल्लिकार्जुन रेडीहाळ, भीमप्पा गोडलकुंदरगी, राजेंद्र हळींगळी, सुरेश कांबळे, इरय्या हिरेमठ, मारुती पाटील, द्राक्षायणी नेसरगी या तेरा जणांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील म्हणून मुरलीधर कुलकर्णी यांनी काम पाहिले. या निकालासंबंधी विशेष सरकारी वकिलांनी पत्रकारांना माहिती दिली. राज्यातील अत्यंत महत्त्वाचा हा खटला होता. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी वरिष्ठावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अडचणीत आणले होते. या प्रकारामुळे एका निष्पाप व निरपराध अधिकाऱ्याला नाहक त्रास सहन करावा लागला होता. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व तेरा जणांना 3 वर्षे 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावल्याचे त्यांनी सांगितले.
दि. 19-11-2014 रोजी हेस्कॉमच्या तत्कालिन साहाय्यक अभियंत्या बी. व्ही. सिंधू यांनी तुकाराम मजगी यांच्यावर विनयभंगाची फिर्याद दिली होती. त्यानंतर ही फिर्याद मागे घेण्यासाठी फोनवरून धमकावल्याची दुसरी फिर्याद दाखल करण्यात आली होती. या प्रकाराला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरूनही तिसरी फिर्याद दाखल झाली होती. या प्रकाराला तुकाराम मजगी हेच कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला होता. माळमारुती पोलिसांनी या तिन्ही प्रकरणांचा तपास करून तशा घटनाच घडल्या नाहीत, या निष्कर्षाप्रत येऊन न्यायालयात बी रिपोर्ट सादर केला होता. तुकाराम मजगी यांना मात्र या प्रकारामुळे नऊ दिवस कारागृहात जावे लागले होते. त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. या सर्व घडामोडींनंतर तुकाराम मजगी यांच्यावर निलंबनाची कारवाईही झाली होती. माळमारुतीचे याआधीचे पोलीस निरीक्षक चन्नकेशव टिंगरीकर व जगदीश हंचनाळ यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. पोलिसांनी सादर केलेल्या बी रिपोर्टला बी. व्ही. सिंधू यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. याचवेळी न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून उर्वरित आरोपींच्या सांगण्यावरून खोटे गुन्हे दाखल केल्याची कबुली या महिला अधिकाऱ्याने दिली होती. तब्बल साडेनऊ वर्षांनंतर या खळबळजनक खटल्याचा निकाल लागला असून सर्व तेरा जणांना न्यायालयाने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
आता हेस्कॉम कोणती कारवाई करणार?
आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला अडचणीत आणण्यासाठी विनयभंगासारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवणाऱ्या तेरा जणांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. आता त्यांच्यावर हेस्कॉम कोणती कारवाई करणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या शिक्षेला आव्हान देण्यासाठी त्यांना मुभा आहे. तीन वर्षाच्या वर शिक्षा झाली असेल तर उच्च न्यायालयात दाद मागितली पाहिजे. सेवानियमानुसार 48 तासांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत असल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होते. आता हेस्कॉमच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.