किती काळ पद भूषवायचे याबाबत कसलीच बोलणी झाली नव्हती

मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांचे स्पष्टीकरण मडगाव : आपली नगराध्यक्षपदी निवड झाली असता किती काळ हे पद भूषवावे यासंदर्भात कोणतीही बोलणी आपल्याकडे आपल्या सहकाऱ्यांनी वा आमच्या नेत्यांनी केली नव्हती, असे मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी स्पष्ट केले आहे. 12 जानेवारी रोजी नगराध्यक्षपदी विराजमान होऊन 15 महिने पूर्ण झाल्याने नगराध्यक्ष शिरोडकर यांनी पायउतार व्हावे, […]

किती काळ पद भूषवायचे याबाबत कसलीच बोलणी झाली नव्हती

मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांचे स्पष्टीकरण
मडगाव : आपली नगराध्यक्षपदी निवड झाली असता किती काळ हे पद भूषवावे यासंदर्भात कोणतीही बोलणी आपल्याकडे आपल्या सहकाऱ्यांनी वा आमच्या नेत्यांनी केली नव्हती, असे मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी स्पष्ट केले आहे. 12 जानेवारी रोजी नगराध्यक्षपदी विराजमान होऊन 15 महिने पूर्ण झाल्याने नगराध्यक्ष शिरोडकर यांनी पायउतार व्हावे, असे सत्ताधारी गटातील नगरसेवक कामिलो बार्रेटो यांनी विधान केले होते. यासंदर्भात सध्या गोव्याबाहेर असलेले नगराध्यक्ष शिरोडकर यांची प्रतिक्रिया जाणली असता त्यांनी वरीलप्रमाणे उद्गार काढले. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांची युती असताना प्रत्येकी 15 महिने याप्रमाणे प्रत्येकी दोन वेळा मडगाव आणि फातोर्डाला विभागून नगराध्यक्षपद देण्याचा समझोता झाला होता. मात्र नंतर राजकीय समीकरणे बदलून भाजप समर्थक मंडळ अस्तिवात आले. त्यामुळे सदर समझोता अस्तिवात राहिलेला नाही.
आपणास नगराध्यक्षपद स्वीकारताना आमच्या कोणाही नेत्याने कालावधीबाबत काहीही सांगितले नव्हते, असे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी स्पष्ट केले. नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांना पदभार सांभाळत असल्यास 15 महिने पूर्ण झालेले असल्याने आता नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ मडगाव तसेच फातोर्डा मतदारसंघातील नगरसेवकांना समानरीत्या भूषविता यावा याकरिता शिरोडकर नगराध्यक्षपदाचा राजीनामा देणार काय अशी चर्चा पालिकेच्या आवारात चालू झाली होती. सत्ताधारी गटातील फातोर्डातील नगरसेवक कामिलो बार्रेटो यांनी नगराध्यक्ष शिरोडकर यांनी 15 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केलेला असल्याने 12 जानेवारीपर्यंत पदावरून पायउतार व्हावे अशी मागणी केली होती. अन्यथा अविश्वास ठराव आणण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे ही चर्चा अधिक रंगली होती. ‘शिरोडकर यांनी अन्य नगरसेवकांनाही पालिकेचे नगराध्यक्षपद भूषविण्याची संधी द्यायला हवी असे मला वाटते आणि हे पद भाजप गटातील फातोर्डातील नगरसेवकास देणे आवश्यक आहे’, असे नगरसेवक बार्रेटो यांनी म्हटले होते.