मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी ग्रामस्थांच्या भेटीला

गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण न्हावेली / वार्ताहर मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी पुर्वचारी देवाच्या उत्सव मुर्तीसह मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी गावात घरोघरी फिरविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला शनिवार 13 जानेवारीपासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमामुळे गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरी आलेल्या तरंगकाठीचे प्रत्येक घरोघरी पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे विधीवत व भक्तिभावाने पूजन […]

मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी ग्रामस्थांच्या भेटीला

गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण
न्हावेली / वार्ताहर
मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी पुर्वचारी देवाच्या उत्सव मुर्तीसह मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी गावात घरोघरी फिरविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला शनिवार 13 जानेवारीपासून सुरुवात झाली असून या कार्यक्रमामुळे गावात सर्वत्र चैतन्याचे व भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरी आलेल्या तरंगकाठीचे प्रत्येक घरोघरी पारंपरिक रितीरिवाजाप्रमाणे विधीवत व भक्तिभावाने पूजन करण्यात येत आहे.मळगाव-सोनुर्ली देवस्थानचा सोनुर्ली माऊली जत्रोत्सब पार पडल्यानंतर मळगाव गावात पंचायतन देवस्थानची तरंगकाठी घरोघरी फिरविण्याची प्रथा गेल्या कित्येक वर्षापासून चालत आली आहे. तत्पूर्वी ही तरंगकाठी मळगाव व सोनुर्ली देवस्थान एक असल्याने मळगाव येथील रवळनाथ जत्रोत्सव झाल्यावर सोनुर्ली जत्रोत्सवासाठी नेली जाते. तरंगकाठी व पालखी जत्रोत्सवानंतर सोनुर्ली येथे पाहुणचारासाठी थांबते. तेथे पाहुणचार झाल्यावर या दरम्यान सोनुर्ली गावातही तरंगकाठी घरोघरी फिरविली जाते. सोनुर्ली येथे तरंगकाठी फिरवून झाल्यावर सोनुर्ली येथे मळगाव गावचे राऊळ व गावकर आदी मानकरी जातात. तेथे कौलप्रसाद घेऊन पंचायतन मळगावला घेऊन आल्यावर तरंगकाठी मळगावात घरोघरी फिरविली जाते. यावेळी गावातील गोसावी मठालाही भेट देण्यात येते.
यासाठी सुमारे महिनाभराचा कालावधी लागतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही शनिवारपासून कुळघराकडून विधिवत तरंगकाठी व पालखीचे पूजन झाल्यावर ढोलांच्या गजरात मानकऱ्यांच्या उपस्थितीत गावचे मानकरी सावंत यांच्या घरापासून तरंगकाठी फिरविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पाडगावकर, जोशी आदी मानकऱ्यांजवळ तरंगकाठी फिरवून बाकी गावात तरंगकाठी फिरविण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी घरातील व्यक्तींनी गंध, पुष्प वाहून तरंगकाठीचे विधीवत पूजन केले. तसेच देवीची ओटी भरण्यात आली. यावेळी काही ठिकाणी सुवासिनींनी तसेच नवीन लग्न झालेल्या महिलांनी देवीस साडी अर्पण करुन नवसफेड केली. या सोहळ्यात घरातील मोठ्यांसह लहान मुलेही सहभागी झाली होती. असंख्य वर्षांची ही परंपरा मळगाव गावचे मानकरी एकोप्याने जपत आले आहे.