समाजात मतभेद असतातच, मनभेद मात्र घातक

समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचे उद्गार, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचा स्थापनादिन कुंकळ्ळी : कोणत्याही समाजात मतभेद असतातच. मात्र मनभेद स्वत:बरोबरच समाजालाही घातक ठरू शकतात, असे प्रतिपादन समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाच्या 83 व्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर आमदार उल्हास तुयेकर, राजेश फळदेसाई, डॉ. चंद्रकांत शेट्यो, माजी […]

समाजात मतभेद असतातच, मनभेद मात्र घातक

समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांचे उद्गार, अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाचा स्थापनादिन
कुंकळ्ळी : कोणत्याही समाजात मतभेद असतातच. मात्र मनभेद स्वत:बरोबरच समाजालाही घातक ठरू शकतात, असे प्रतिपादन समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी अखिल गोमंतक क्षत्रिय मराठा समाजाच्या 83 व्या स्थापनादिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर आमदार उल्हास तुयेकर, राजेश फळदेसाई, डॉ. चंद्रकांत शेट्यो, माजी आमदार नरेश सावळ, समाज संघटनेचे अध्यक्ष सुहास फळदेसाई व सचिव दिप्तेश देसाई उपस्थित होते. मंत्री फळदेसाई पुढे बोलताना म्हणाले की, समाजातील युवावर्गाला योग्य मार्गदर्शन करून समाजाबरोबरच राज्याचा विकास साधण्याचे लक्ष्य समाज संघटनेने बाळगायला हवे. समाजातील गरजवंतांना मदतीचा हात देण्याचे व समाजात सौहार्दतेचे वातावरण निर्माण करण्याचे कार्य समाज संघटनेने हाती घ्यायला हवे. आजच्या स्पर्धात्मक युगात तलवारीचे स्थान पेन व बुद्धीने घेतले आहे आज आपण ज्ञानाच्या बळावर जग काबिज करू शकतो, असे ते म्हणाले. समाजातील युवकांना उद्योग व अन्य क्षेत्रांतील नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी तयार करण्याचे काम समाज संघटनेने हाती घ्यावे. समाजाची भव्य अशी वास्तू आज अपूर्णावस्थेत आहे.
ती पूर्ण करण्यासाठी आपण सर्व ती मदत करण्यास तयार आहे. इतर समाजबांधवांनीही क्षत्रिय मराठा समाज संकुलाच्या बांधकामास मदत करावी, असे आवाहन मंत्री फळदेसाई यांनी केले. नवीन समितीने समाजाच्या गरीब घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. यावेळी आमदार तुयेकर, आमदार फळदेसाई, आमदार डॉ. शेट्यो, माजी आमदार सावळ यांनी आपले विचार मांडले व समाज संकुलाच्या कामात सर्व ती मदत देण्याची इच्छा व्यक्त केली. मान्यवरांच्या हस्ते समाजाच्या वेबसाइटचे उद्घाटन, समाज संघटनेच्या कॅलेंडर व संपर्क क्रमांकांचे अनावरण करण्यात आले. यावेळी समाजाच्या सदस्यांना सदस्यता कार्डचे वितरण करण्यात आले. सुहास फळदेसाई यांनी स्वागत करून संघटनेच्या भावी योजनांची माहिती दिली. श्रद्धा शेट्यो यांनी नव्या कार्यकारिणीची ओळख करून दिली. सूत्रसंचालन डॉ. संक्रिता फळदेसाई यांनी केले, तर आभार विजयकुमार कोप्रे यांनी मानले. गौरक फळदेसाई, इच्छित फळदेसाई, उद्धव शेट्यो, लक्ष्मण परब, अमर देसाई व प्रसाद देसाई यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. दरम्यान, स्थापनादिनाचे औचित्य साधून सत्यनारायण पूजा आयोजिण्यात आली होती. पूजेचे यजमानपद संघटनेचे कोषाध्यक्ष दुलबाराव देसाई व त्यांच्या पत्नीने भूषविले.