पणजीतील मुख्य रस्त्यांचे काम पूर्ण

इमेजिन पणजी स्मार्ट सिटीचा खंडपीठात दावा : सांत इनेज रस्त्याचे केवळ 25 टक्के काम बाकी पणजी : राजधानी पणजी शहरातील 3.5 कि.मी. मुख्य रस्त्यांचे काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित करण्यात आले आहेत. सांत इनेज येथील श्री ताडमाड मंदिर ते टोंकापर्यंत फक्त 25 टक्के काम बाकी असल्याची माहिती ‘इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लि.’तर्फे मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात देण्यात आली. […]

पणजीतील मुख्य रस्त्यांचे काम पूर्ण

इमेजिन पणजी स्मार्ट सिटीचा खंडपीठात दावा : सांत इनेज रस्त्याचे केवळ 25 टक्के काम बाकी
पणजी : राजधानी पणजी शहरातील 3.5 कि.मी. मुख्य रस्त्यांचे काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित करण्यात आले आहेत. सांत इनेज येथील श्री ताडमाड मंदिर ते टोंकापर्यंत फक्त 25 टक्के काम बाकी असल्याची माहिती ‘इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लि.’तर्फे मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात देण्यात आली. दुसऱ्या बाजूने श्री ताडमाड देवस्थानाजवळ खोदकाम केल्याने वटपौर्णिमा कशी साजरी करावी, असा सवाल शितल नाईक यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. अनियंत्रित आणि मनमानी ‘स्मार्ट सिटी’च्या कामामुळे वैतागलेल्या पणजीवासियांनी मुंबई उच्च न्यायालयाचा गोवा खंडपीठात दोन जनहित याचिका दाखल केलेल्या होत्या. त्यावर आजपर्यंतच्या ‘स्मार्ट सिटी’च्या कामाचा पूर्ततेचा अहवाल ‘इमेजिन पणजी’तर्फे मुख्य सरव्यवस्थापक एदुआर्द परेरा यांच्याकडून सोमवारी 10 जून रोजी खंडपीठात सादर करण्यात आला. या अहवालानुसार, पणजी शहराचा कामासाठी दोन विभाग म्हणजे मध्यवर्ती पणजी आणि सांत इनेज असे करण्यात आले आहेत. मध्यवर्ती पणजीत सुमारे 3.5 किमी मुख्य रस्त्यांचे जाळे पूर्ण झाले असून त्यावर वाहतूक व्यवस्था सुऊ करण्यात आली असल्याचे सरव्यवस्थापकानी सांगितले आहे. सांत इनेज भागातील सुमारे 3.5 किमीपैकी 2.85 किमी रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून त्यावर वाहने धावत आहेत.
जनतेला त्रास पडत नाही?
श्री ताडमाड मंदिर ते टोंका येथील मलनिस्सारण प्रकल्पापर्यंत 150 मीटरचे काम सध्या सुऊ आहे. यातील 25 टक्के काम प्रलंबित असून त्यात 3 मेनहोल तसेच काँक्रीट रस्ता आणि पदपथाचे काम बाकी आहे. मात्र, या 150 मीटरचा रस्ता अजून तयार न झाल्याने सर्वसाधारण जनतेला काहीही त्रास पडत नाही, कारण त्यांना घरी व आपापल्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था देण्यात आली असल्याचे दाखवण्यात आले आहे. याआधी सरकारी आश्वासनावर विश्वास न ठेवता खंडपीठाचे न्या. वाल्मिकी मिनेझिस आणि न्या. महेश सोनक यांनी 1 एप्रिल रोजी पणजी शहरात प्रत्यक्षात उतरून सर्व कामांची माहिती घेतली होती. त्यानंतर त्यांनी 3 एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीवेळी आपले निरीक्षण सविस्तररित्या मांडून प्रशासनाला काही सूचना आणि शिफारशीही केल्या होत्या. अनियोजित स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे धूळ प्रदूषण रोखण्यासाठी, वाहतूक व्यवस्था आणि रस्ता सुरक्षेबाबत सुधारण्यासाठी हाती घेतलेल्या उपाययोजनाबाबत दोन्ही न्यायधीशांनी 23 एप्रिल रोजी महत्त्वाच्या सूचना मांडल्या होत्या. त्यात ‘स्मार्ट सिटी’चे काम 31 मे 2024 पर्यंत पूर्ण होण्याचे आश्वासन सीईओ संजीत रॉड्रिगीस यांनी दिले होते. मात्र अजूनही कामे पूर्ण झालेली नाहीत.
वटपौर्णिमा कशी साजरी कारायची?
सांत इनेझ येथील श्री ताडमाड देवस्थानाजवळ गटारासाठी उभारलेली भींत कोसळल्याने तेथील वटवृक्षाच्या आजूबाजूला अडचण व धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या 21 जून रोजी महिलांनी वटपौर्णिमा कशी साजरी करावी? असा प्रश्न शितल नाईक यांनी उपस्थित केला आहे. श्री ताडमाड देवस्थान हे पणजी, ताळगाव आणि परिसरातील लोकांचे श्रध्दास्थान आहे. दरवर्षी याच  वटवृक्षाला प्रदक्षिणे घालून महिला वटपौर्णिमा साजरी करतात. यावर्षी त्यात खंड पडू नये म्हणून किमान वटवृक्षाभोवती प्रदक्षिणा घालण्याइतकी जागा व्यवस्थित करून द्यावी, अशी मागणी नाईक यांनी केली आहे. नाईक यांच्यासोबत विनय नाईक व अन्य उपस्थित होते. स्मार्ट सिटीचे काम कसे चालले आहे, ते नव्यने सांगायची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे लक्ष देणे नितांत गरजेचे आहे. मलनिस्सारणाचा चेंबर श्री ताडमाड मंदिरासमोरच बांधण्यात आला आहे. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढली किंवा तो भरून वाहू लागला तर त्याचा घाण वास मंदिर परिसरात पसरणार आहे. तो चेंबर दुसरीकडे हलविल्यास चांगले होईल, असेही त्या म्हणाल्या.