विंडीजचा द. आफ्रिकेवर 28 धावांनी विजय

सामनावीर किंगचे शानदार अर्धशतक, मोती, फोर्ड यांचे प्रत्येकी 3 बळी वृत्तसंस्था/ किंग्जस्टन तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात यजमान विंडीजने द. आफ्रिकेचा 28 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. विंडीजचा कर्णधार ब्रेन्डॉन किंगने 45 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारासह 79 धावा जमविल्याने त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. विंडीजच्या मोती आणि […]

विंडीजचा द. आफ्रिकेवर 28 धावांनी विजय

सामनावीर किंगचे शानदार अर्धशतक, मोती, फोर्ड यांचे प्रत्येकी 3 बळी
वृत्तसंस्था/ किंग्जस्टन
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात यजमान विंडीजने द. आफ्रिकेचा 28 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. विंडीजचा कर्णधार ब्रेन्डॉन किंगने 45 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारासह 79 धावा जमविल्याने त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. विंडीजच्या मोती आणि फोर्ड यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजी दिली. विंडीजने 20 षटकात 8 बाद 175 धावा जमवित द. आफ्रिकेला विजयासाठी 176 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर द. आफ्रिकेचा डाव 19.5 षटकात 147 धावात आटोपला. हेंड्रिंक्सचे अर्धशतक वाया गेले.
विंडीजच्या डावामध्ये केवळ तीन फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. कर्णधार किंग, मेयर्स आणि चेस यांनी दमदार फलंदाजी केली. किंग आणि चार्ल्स या सलामीच्या जोडीने 22 चेंडूत 36 धावांची भागीदारी केली. त्यामध्ये चार्ल्सचा वाटा केवळ एका धावेचा होता. चार्ल्स बाद झाल्यानंतर किंग आणि मेयर्स यांनी दुसऱ्या गड्यासाठी 79 धावांची भागीदारी केली. किंगने आक्रमक फटकेबाजी केल्याने विंडीजला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. मेयर्सने 25 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 34 तर चेसने 30 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह नाबाद 32 धावा जमवल्या. विंडीजच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. विंडीजच्या डावात 10 षटकार आणि 9 चौकार नोंदवले गेले. द. आफ्रिकेतर्फे बार्टमन आणि फेलुकेवायो यांनी प्रत्येकी 3 तर कोझीने एक गडी बाद केला. विंडीजने पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात 64 धावा जमवताना एक गडी गमवला. किंगने 26 चेंडूत 3 षटकार आणि चौकारासह अर्धशतक झळकवले. विंडीजचे अर्धशतक 29 चेंडूत, शतक 57 चेंडूत आणि दीडशतक 92 चेंडूत नोंदवले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना द. आफ्रिकेच्या डावामध्ये रेझा हेंड्रीक्सने एकाकी लढत देत 51 चेंडूत 6 षटकार आणि 6 चौकारासह 87 धावा जमवल्या. ब्रिझने 4 चौकारासह 19 तर कर्णधार व्हॅन डेर ड्युसेनने 17 चेंडूत 1 चौकारासह 17 धावा जमवल्या. विंडीजतर्फे मोतीने 25 धावात 3, फोर्डने 27 धावात 3, मॅकॉयने 15 धावात 2 तसेच चेस आणि जोसेफ यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. द. आफ्रिकेच्या डावात 6 षटकात आणि 13 चौकार नोंदवले गेले. द. आफ्रिकेने पॉवर प्लेच्या 6 षटकात 46 धावा जमवताना 3 गडी गमवले. हेंड्रीक्सने 32 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारासह अर्धशतक झळकवले. द. आफ्रिकेचे अर्धशतक 38 चेंडूत, शतक 85 चेंडूत नोंदवले गेले.
संक्षिप्त धावफलक : विंडीज 20 षटकात 8 बाद 175 (किंग 79, मेयर्स 34, चेस नाबाद 32, अवांतर 19, फेलुकेवायो आणि बर्टमन प्रत्येकी 3 बळी, कोझी 1-30), द. आफ्रिका 19.5 षटकात सर्वबाद 147 (हेंड्रीक्स 87, ब्रिज 19, ड्यूसेन 17, अवांतर 5, मोती 3-25, फोर्ड 3-27, चेस व जोसेफ प्रत्येकी एक बळी, मॅकॉय 2-15).