ख्रिसमससाठी सारे शहर सज्ज

विद्युत रोषणाईमुळे चर्चच्या परिसरांमध्ये झगमगाट प्रतिनिधी/ बेळगाव सोमवारी साजऱ्या होणाऱ्या ख्रिसमससाठी सारे शहर सज्ज झाले आहे. ख्रिस्तीबांधवांची ख्रिसमसच्या स्वागतासाठीची तयारी आठवड्यापासून सुरू झाली आहे. यानिमित्त घरांची साफसफाई करून रंगरंगोटी केली आहे. या समाजातील महिला खास ख्रिसमससाठी गोड-तिखट पदार्थ बनविण्याच्या तयारीत गुंतल्या आहेत. तसेच आपल्या घरासमोर आकाशदिवे आणि प्रामुख्याने चांदण्याचे आकाश दिवे किंवा चांदण्यांच्या प्रतिकृती लावल्या […]

ख्रिसमससाठी सारे शहर सज्ज

विद्युत रोषणाईमुळे चर्चच्या परिसरांमध्ये झगमगाट
प्रतिनिधी/ बेळगाव
सोमवारी साजऱ्या होणाऱ्या ख्रिसमससाठी सारे शहर सज्ज झाले आहे. ख्रिस्तीबांधवांची ख्रिसमसच्या स्वागतासाठीची तयारी आठवड्यापासून सुरू झाली आहे. यानिमित्त घरांची साफसफाई करून रंगरंगोटी केली आहे. या समाजातील महिला खास ख्रिसमससाठी गोड-तिखट पदार्थ बनविण्याच्या तयारीत गुंतल्या आहेत. तसेच आपल्या घरासमोर आकाशदिवे आणि प्रामुख्याने चांदण्याचे आकाश दिवे किंवा चांदण्यांच्या प्रतिकृती लावल्या आहेत.
सणाच्या निमित्ताने शहरातील बेकरींमध्ये ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजच्या प्रतिकृती, लालरंगाच्या टोप्या व सजावटीचे असंख्य साहित्य दाखल झाले आहे. ख्रिसमस ट्री आणून सजावट करण्यात आली आहे. विविध कार्यालयांमध्येही ख्रिसमस ट्री उभारण्यात आल्यामुळे ख्रिसमसचा माहोल बनला आहे.
बेळगाव डायोसिसच्या कक्षेत येणाऱ्या चर्चमध्येही ख्रिसमसची तयारी सुरू झाली आहे. ख्रिसमसच्या पूर्वी ख्रिस्तीबांधव चर्चमध्ये जाऊन कन्फेशन करतात. म्हणजेच एका अर्थाने आपल्याकडून कळत-नकळत काही चूक किंवा गुन्हा झाला असल्यास त्याची कबुली करून माफीनामा मागितला जातो. ख्रिसमसच्या निमित्ताने बेळगाव डायोसिसचे बिशप फादर डेरेक फर्नांडिस यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. सर्व चर्चमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे चर्चचे परिसर झगमगत आहेत.
सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा
बेळगावचे बिशप डेरेक फर्नांडिस यांचा संदेश
दया, क्षमा, शांती यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे येशू ख्रिस्त होय. त्यामुळेच नाताळ अर्थात ख्रिसमस साजरा करताना आपल्यासमवेत वंचित घटकसुद्धा ख्रिसमस साजरा करतील, असा प्रयत्न करा. आजही उपासमारीमुळे अनेक लोकांना दोन वेळचे भोजन मिळणे अशक्य आहे. अशावेळी ख्रिसमसच्या निमित्ताने त्यांना अन्नदान किंवा अन्य कोणत्याही स्वरुपात मदत करून ख्रिसमस साजरा करता येईल. यासाठी प्रयत्न करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा, असा संदेश बेळगावचे बिशप डेरेक फर्नांडिस यांनी दिला आहे.
ते म्हणाले, येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा पृथ्वीतलावर स्वर्गातून अवतरले आणि त्यांनी देवाचा गौरव करताना शांततेचा, जनहिताचा संदेश दिला. परंतु, गेल्या दोन हजार वर्षांत येशूचा जन्म झालेल्या ठिकाणी अशांतता आणि अस्वस्थ वातावरण आहे. ट्रायलमधील सध्याची परिस्थिती अतिशय भीषण असून तेथे क्रौर्याने परिसीमा गाठली आहे. अशांत प्रदेशात जन्माला येऊनसुद्धा येशू ख्रिस्ताने शांततेचा संदेश दिला. सर्व प्राणीमात्रांवर दया दाखवा, असे आवाहन केले. आज येशूच्या संदेशानुसार मार्गक्रमण करून शांतता नांदावी, यासाठी प्रार्थना करूया, असे ते म्हणाले.