12 वर्षानंतर सुपर ओव्हरचा थरार
नामिबियाचा ओमानवर रोमांचक विजय :: अष्टपैलू डेव्हिड वीसे ठरला सामन्याचा शिल्पकार
वृत्तसंस्था/ ब्रीजटाऊन, वेस्ट इंडिज
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील रोमहर्षक सामन्यात नामिबियाने ओमानचा पराभव करून विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना ओमानने 109 धावा केल्या. प्रत्युत्तरात, नामिबियाचा संघही केवळ 109 धावाच करू शकला. त्यामुळे या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने 6 चेंडूत 21 धावा करत ओमानला 22 धावांचे आव्हान दिले तर ओमानला फक्त दहा धावा करता आल्या. सुपर ओव्हरमध्ये नामिबियासाठी डेव्हिड वीसे हिरो ठरला. त्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत शानदार कामगिरी केली. विशेष म्हणजे, टी-20 वर्ल्डकपमध्ये 2012 नंतर तब्बल 12 वर्षानी सुपर ओव्हरचा रोमांच पहायला मिळाला.
नामिबियाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नामिबियाने ओमानला 19.4 षटकांत 109 धावांमध्ये ऑलआऊट केले. डावातील पहिल्याच षटकात ट्रम्पलमनने पहिल्या दोन चेंडूवर ओमानला सलग दोन धक्के दिले. यानंतर तिसऱ्या षटकात नसीम खुशी स्वस्तात बाद झाल्याने ओमानची 3 बाद 10 अशी बिकट स्थिती झाली होती. यानंतर झीशान मकसूद व खलीद कैल या जोडीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण मकसूद 22 धावांवर बाद झाला. खलीद कैलने सर्वाधिक 39 चेंडूत 34 धावांचे योगदान दिले तर अयान खानने 15 धावा केल्या. इतर तळाच्या फलंदाजांनी केवळ हजेरी लावण्याचे काम केल्याने ओमानचा डाव 109 धावांवर संपला. नामिबियाकडून रुबेन ट्रम्पलमनने 21 धावांत 4 बळी घेतले, तर वीसेने 28 धावांत 3 बळी घेतले.
लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाची सुरुवात खराब झाली आणि संघाला 20 षटकात 6 विकेट गमावत केवळ 109 धावा करता आल्या. मायकल लिंगेनला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर निकोलास डेविन आणि जान फ्रायलिन्क यांनी दुसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भागिदारी केली. 9 व्या षटकात निकोलास डेविन बाद झाला. डेविनने 31 चेंडूमध्ये दोन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 24 धावा केल्या. यानंतर फ्रायलिन्क आणि गेरहार्ड इरास्मस यांनी 31 (36 चेंडू) धावांची भागिदारी केली. ही जोडी धोकादायक ठरतेय, असे वाटत असताना अयान खानने गेरहार्डला तंबूत पाठवले. गेरहार्डने 13 धावा केल्या. त्यानंतर जेजे स्मिटच्या रुपाने नामिबियाने चौथी विकेट गमावली. स्मिटने 8 धावा केल्या. फ्रायलिन्क मोक्याच्या क्षणी बाद झाला. त्याने सहा चौकाराच्या मदतीने 45 धावांचे योगदान दिले. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज होती, पण नामिबियाला एकच धाव मिळाली व सामना टाय झाला. ओमानकडून मेहरान खानने 7 धावांत 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : ओमान 19.4 षटकांत सर्वबाद 109 (झीशान मकसूद 22, खलीद कैल 34, अयान खान 15, ट्रम्पलमन 4 तर डेव्हिड वीसे 3 बळी).
नामिबिया 20 षटकांत 6 बाद 109 (निकोलास डेविन 24, फ्रायलिन्क 45, इरास्मस 13, मेहरान खान 7 धावांत 3 बळी).
सुपर ओव्हरमध्ये घडले तर काय…
सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने 21 धावा ठोकल्या. संघासाठी डेव्हिड वीसेने पहिल्या दोन चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार ठोकत 10 धावा केल्या. यानंतर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि चौथ्या चेंडूवर 1 धाव आली. यानंतर स्ट्राईकवर आलेल्या कर्णधार गेरहार्ड इरास्मसने 2 चेंडूत 2 चौकार मारून संघाला 21 धावांपर्यंत नेले. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना ओमानला 1 बाद 10 धावाच करता आल्या. सामन्यात शानदार कामगिरी करणाऱ्या ओमानच्या खेळाडूंनी सुपर ओव्हरमध्ये मात्र निराशा केली.
टी-20 वर्ल्डकपमधील सुपर ओव्हरचा थरार
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासातील तिसरी सुपर ओव्हर पहायला मिळाली. वर्ल्डकपमध्ये पहिली सुपर ओव्हर 2012 मध्ये खेळवली गेली होती, जेव्हा कँडीमध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकेने न्यूझीलंड संघाचा पराभव केला होता. तर 2012 मध्येच वेस्ट इंडिजने न्यूझीलंड संघाचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला होता. यानंतर तब्बल 12 वर्षानंतर पुन्हा सुपर ओव्हरचा थरार पहायला मिळाला. सोमवारी झालेल्या या रोमांचक सामन्यात नामिबियाने ओमानचा 11 धावांनी पराभव केला.
Home महत्वाची बातमी 12 वर्षानंतर सुपर ओव्हरचा थरार
12 वर्षानंतर सुपर ओव्हरचा थरार
नामिबियाचा ओमानवर रोमांचक विजय :: अष्टपैलू डेव्हिड वीसे ठरला सामन्याचा शिल्पकार वृत्तसंस्था/ ब्रीजटाऊन, वेस्ट इंडिज आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील रोमहर्षक सामन्यात नामिबियाने ओमानचा पराभव करून विजयासह आपल्या मोहिमेची सुरुवात केली. प्रथम फलंदाजी करताना ओमानने 109 धावा केल्या. प्रत्युत्तरात, नामिबियाचा संघही केवळ 109 धावाच करू शकला. त्यामुळे या सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरमध्ये नामिबियाने 6 […]