पोलिसांनी आवळल्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या

खानापूर परिसरात बारा घरफोड्या, दागिन्यांसह 43 लाखांचा मुद्देमाल जप्त बेळगाव : खानापूर परिसरात गेल्या तीन वर्षांत बारा घरफोड्या करणाऱ्या कल्लेहोळ (ता. बेळगाव) येथील एका युवकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. खानापूर पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्याजवळून 43 लाख 23 हजार 115 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी […]

पोलिसांनी आवळल्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या

खानापूर परिसरात बारा घरफोड्या, दागिन्यांसह 43 लाखांचा मुद्देमाल जप्त
बेळगाव : खानापूर परिसरात गेल्या तीन वर्षांत बारा घरफोड्या करणाऱ्या कल्लेहोळ (ता. बेळगाव) येथील एका युवकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. खानापूर पोलिसांनी ही कारवाई केली असून त्याच्याजवळून 43 लाख 23 हजार 115 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख आर. बी. बसरगी, बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक, खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक व इतर अधिकारी उपस्थित होते. परशुराम नाना गौंडाडकर (वय 35), रा. कल्लेहोळ, ता. बेळगाव असे त्याचे नाव आहे.
चोरीच्या घटनेनंतर घटनास्थळावर उपलब्ध झालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारावर खानापूर पोलिसांनी परशुरामला अटक केली आहे. त्याच्याजवळून 673 ग्रॅम 4 मिली सोन्याचे दागिने, 627 ग्रॅम चांदीचे दागिने, 16 हजार रुपये रोकड असा एकूण 43 लाख 23 हजार 115 रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. खानापूर परिसरात दिवसा घरफोड्या वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बैलहोंगलचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक, उपनिरीक्षक चन्नबसव बबली, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एन. के. पाटील, हवालदार बी. जी. यलीगार, जगदीश काद्रोळी, जयराम हम्मण्णावर, मंजुनाथ मुसळी, प्रवीण होंडद, पुंडलिक मादर आदींचा समावेश असलेल्या पथकाने परशुरामला अटक केली. पोलीस मुख्यालयातील तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कण्णवर, सचिन पाटील व तांत्रिक विभागाचे एम. एफ. पाटील आदींचीही या कारवाईसाठी मदत लागल्याचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले. परशुराम हा भरदिवसा घरफोड्या करीत होता. एकाकी घरांना तो लक्ष्य बनवत होता. त्याला अटक करणाऱ्या पोलीस पथकाला बक्षीस देण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले.
सराईत गुन्हेगार
कल्लेहोळचा परशुराम हा अट्टल घरफोड्या आहे. 2021 मध्ये एक, 2022 मध्ये चार व 2023 मध्ये त्याने सात घरफोड्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. खानापूर शहर व परिसरात त्याने एकूण 12 घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.