निल वेग्नरचे पुनरागमन?

निल वेग्नरचे पुनरागमन?

वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
कसोटी क्रिकेटमधून यापूर्वीच निवृत्त झालेला न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज निल वेग्नरला क्रिकेट न्यूझीलंडकडून पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी आणि शेवटची कसोटी ख्राईस्ट चर्च येथे 8 मार्चपासून होणार आहे. या कसोटीसाठी वेग्नरला पुन्हा बोलावणे होण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाज ओरुरकी हा पहिल्या कसोटीत दुखापतीमुळे जायबंदी झाल्याने तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. गेल्याच आठवड्यात वेग्नरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. वेग्नरने यापूर्वी आपल्या कसोटी कारकिर्दीत 64 सामन्यात 260 बळी मिळविले आहेत. दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला वेग्नर याने ऑस्ट्रेलिया बरोबरची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी निवृत्तीचा निर्णय घेतला होता. दरम्यान वेग्नरसाठी न्यूझीलंडचे दरवाजे सदैव खुले राहतील, अशी प्रतिक्रिया कर्णधार टीम साऊदीने व्यक्त केली आहे.
निल वेग्नरने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करावे यासाठी ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने वेगनरला आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.