पोलीस यंत्रणेवर वाढतोय ताण; चार दिवसांत दोन अधिकाऱ्यांना हदय विकाराचे झटके

अनेक कर्मचारीही बनले अनफिट : मोर्चा, आंदोलन, कायदा सुव्यस्था सांभाळताना पोलीस दलाची कसरत, प्रलंबित गुह्यांची संख्येतही वाढ आशिष आडिवरेकर / कोल्हापूर सोशल मिडीयावरील पोस्ट, राजकीय ताण तणाव, निवडणूक बंदोबस्त याचसोबत मंत्र्यांचे दौरे यामुळे पोलीस यंत्रणेवरील बंदोबस्ताचा ताण सातत्याने वाढत आहे. यामुळे ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रिद वाक्य घेऊन 24 तास जनतेच्या सेवेत असणाऱ्या पोलीस दलाचे आरोग्यच […]

पोलीस यंत्रणेवर वाढतोय ताण; चार दिवसांत दोन अधिकाऱ्यांना हदय विकाराचे झटके

अनेक कर्मचारीही बनले अनफिट : मोर्चा, आंदोलन, कायदा सुव्यस्था सांभाळताना पोलीस दलाची कसरत, प्रलंबित गुह्यांची संख्येतही वाढ
आशिष आडिवरेकर / कोल्हापूर
सोशल मिडीयावरील पोस्ट, राजकीय ताण तणाव, निवडणूक बंदोबस्त याचसोबत मंत्र्यांचे दौरे यामुळे पोलीस यंत्रणेवरील बंदोबस्ताचा ताण सातत्याने वाढत आहे. यामुळे ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रिद वाक्य घेऊन 24 तास जनतेच्या सेवेत असणाऱ्या पोलीस दलाचे आरोग्यच धोक्यात आले आहे. नुकतेच पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांना हदय विकाराचे झटके आले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक उपचारासाठी दाखल आहे. यामुळे कोल्हापूर पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच पोलीस आयुक्तालयाचा प्रश्नही मार्गी लावणे आवश्यक आहे.
घरात वाद झाला चला पोलीस स्टेशनला… शेतीचा वाद, काहीही झाले तरी चला पोलीस स्टेशनला सध्या पोलीस दलाकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पूर्वी पोलीस ठाण्याची पायरी चढणे म्हणजे नागरिकांच्या छातीत गोळा येत होता. आता मात्र वाढत्या कामाच्या ताणामुळे पोलीसांच्या छातीत गोळा येण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना सध्या 12 – 12 तास ड्युटीचे शेड्यूल आहे. याचसोबत कोल्हापूरात सध्या आंदोलनांचे प्रमाण वाढले आहे. आगामी काळात लोकसभा, विधानसभा यासोबतच महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणूका येवू घातल्या आहेत. याचाही ताण पोलीस यंत्रणेवर पडणार आहे. तसेच शहरासह जिह्यात काही समाजकंटकांकडून जातिय तेढ निर्माण करण्याचे जाणिवपुर्वक प्रयत्न सुरु आहेत. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बहुतांशी वेळ कायदा सुव्यवस्था राखण्यातच जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी शहरात झालेल्या दंगलीत पोलिसांना 48 तास खडा पहारा ठेवावा लागला. यानंतर मंत्र्यांचे दौरे आणि रोजची मोर्चा, निदर्शने यासाठीचा बंदोबस्त यामुळे पोलीस दलावर सध्या ताण वाढत आहेत. अशातच आहे त्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर बंदोबस्त करावा लागत आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष द्यायचे की रोजच्या दाखल होणाऱ्या गुह्यांचा तपास करायचा असा प्रश्न पोलीस कर्मचाऱ्यांसमोर उभा आहे. दररोज प्रत्येक कर्मचाऱ्याकडे तपासासाठी येणाऱ्या गुह्यांची संख्या तुलनेत जास्त आहे. या गुह्यांचा तपास बंदोबस्ताच्या ताण तणावमुळे प्रलंबित राहत आहेत.
आठ तासांची ड्युटी करा
गृह विभागाने मुंबईमध्ये पोलीसांची ड्युटी आठ तासांची केली आहे. मात्र राज्यात अन्यसर्वच ठिकाणी पोलिसांची ड्युटी 12 तासाची आहे. मुंबईच्या धर्तीवर कोल्हापूरमध्येही 8 तासांची ड्युटी करण्यात यावी अशी मागणी पोलीस दलातून होत आहे.
हे आहेत उपाय
8 तासाची ड्युटी करणे
सुट्यांचे नियोजन वेळोवेळी करणे गरजेचे
वैद्यकीय तपासणी
आधुनिक साधन सामग्री
आयुक्तालायचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक
अंबाबाई मंदिर सुरक्षा व्यवस्था वेगळी करणे
गेल्या काही महिन्यातील आंदोलन व बंदोबस्त
शेतकरी संघटना आंदोलन
मराठा आंदोलन, जरांगे पाटील यांची सभा
सोशल मिडीयावरील पोस्टमुळे निर्माण झालेले जातीय तेढ
साखर कारखाना, ग्रामपंचायत बंदोबस्त
मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, यासह राज्यातील विविध मंत्र्यांचे दौरे
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील फसवणुकीच्या गुन्ह्यांचा तपास
आगामी वर्षात आणखी ताण वाढणार
जानेवारी महिनाअखेरीस लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तसेच मराठा आंदोलनाचा निर्णय आणि त्यानंतर उमठणारे पडसाद या काळात कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभा आणि महापालिका, जिल्हापरिषद यामुळे पोलिस यंत्रणेवरील ताण आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. याचे नियोजन करणे आवश्यक आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत घडणाऱ्या घटनांमुळे पोलीस दलातील ताण वाढत आहे. आगामी वर्षातही निवडणूका आणि बंदोबस्तामुळे यामध्ये भर पडणार आहे. तत्पूर्वीच कर्मचाऱ्यांच्या अर्जित व इतर रजांच्या सुट्टयांचे नियोजन करण्याच्या सुचना पोलीस स्टेशन स्तरावर देण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत

Go to Source