गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींची याचिका फेटाळली

पोलिसांच्या कृतीविषयी अहवाल मागविण्यास उच्च न्यायालयाचा नकार प्रतिनिधी/ बेंगळूर पुरोगामी विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आम्हाला चौकशीवेळी शारीरिक त्रास दिला आहे. याविषयी विशेष चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना राज्य सरकारला द्यावी, अशी चार आरोपींनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटकेत असलेले आरोपी सुजीत कुमार, मनोहर […]

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींची याचिका फेटाळली

पोलिसांच्या कृतीविषयी अहवाल मागविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
प्रतिनिधी/ बेंगळूर
पुरोगामी विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आम्हाला चौकशीवेळी शारीरिक त्रास दिला आहे. याविषयी विशेष चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना राज्य सरकारला द्यावी, अशी चार आरोपींनी दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटकेत असलेले आरोपी सुजीत कुमार, मनोहर यावडे, अमोल काळे आणि अमित डिगवेकर यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर बुधवारी न्यायमूर्ती एन. एस. संजयगौडा यांच्या एकसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी झाली. प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यामुळे त्यांच्या विनंतीची दखल घेतली जाऊ शकणार नाही, असे खंडपीठाने सपष्ट केले.
याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद करताना, आम्हाला अटक करताना पोलिसांनी कायदेशीरपणे आमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा निकटवर्तीयांना कोणतीही माहिती दिली नाही. अटकेनंतर पोलिसांनी कोठडीत अत्यंत वाईट वागणूक दिली. शारीरिक त्रास दिला. त्यामुळे पोलिसांच्या नियमबाह्या कारवाईविषयी चौकशी करून न्यायालयाला अहवाल देण्याची सूचना राज्य गृहखात्याच्या मुख्य सचिवांना द्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली होती.