सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना माघारी धाडले

संतिबस्तवाड येथील शेतकऱ्यांचा विरोध : स्थगितीची प्रत देताच थांबविले काम, आणखी 15 शेतकऱ्यांनी घेतली स्थगिती बेळगाव : रिंगरोडमधील झाडांचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना संतिबस्तवाड येथे शेतकऱ्यांनी माघारी धाडले आहे. न्यायालयातून स्थगिती घेतली असताना झाडांचा सर्व्हे करण्यासाठी गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी स्थगितीचा आदेश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे देण्यात आला. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी तेथून काढतापाय घेतला. शुक्रवारी […]

सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना माघारी धाडले

संतिबस्तवाड येथील शेतकऱ्यांचा विरोध : स्थगितीची प्रत देताच थांबविले काम, आणखी 15 शेतकऱ्यांनी घेतली स्थगिती
बेळगाव : रिंगरोडमधील झाडांचा सर्व्हे करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांना संतिबस्तवाड येथे शेतकऱ्यांनी माघारी धाडले आहे. न्यायालयातून स्थगिती घेतली असताना झाडांचा सर्व्हे करण्यासाठी गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी स्थगितीचा आदेश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे देण्यात आला. त्यानंतर त्या कर्मचाऱ्यांनी तेथून काढतापाय घेतला. शुक्रवारी आणखी 15 शेतकऱ्यांनी रिंगरोड विरोधात स्थगिती मिळविल्याचे अॅड. एम. जी. पाटील आणि अॅड. प्रसाद सडेकर यांनी सांगितले. याचबरोबर इतर शेतकऱ्यांनीही स्थगिती घेण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. शुक्रवारी संतिबस्तवाड परिसरात सर्व्हे करण्यासाठी बागायत खात्याचे कर्मचारी गेले होते. झाडांचा सर्व्हे करून त्यावर क्रमांक घालतानाच शेतकऱ्यांनी त्यांना अडविले. रिंगरोडमध्ये बेळगाव तालुक्यातील 32 गावांतील तिबारपिकी जमीन जाणार आहे. यामुळे शेतकरी भूमीहीन होणार आहेत. त्याला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. यापूर्वी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हरकती दाखल केल्या होत्या.
मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या भूसंपादन अधिकाऱ्यांनी त्या हरकती फेटाळल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांना उच्च न्यायालयात धाव घेतल्याशिवाय पर्याय उरला नाही. उच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक अडचण निर्माण होत आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती घेण्याकडे दुर्लक्ष केले. मात्र काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. आतापर्यंत 55 हून अधिक शेतकऱ्यांनी स्थगिती मिळविली आहे. मात्र अजूनही मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी स्थगिती मिळविण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. रिंगरोडमध्ये 1200 एकरहून अधिक जमीन जाणार आहे. त्यामुळे शेतकरी भूमीहीन होणार आहे. याचबरोबर बुडादेखील इतर जमीन कब्जात घेण्याची शक्यता आहे. तेव्हा तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी याबाबत गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. संतिबस्तवाड येथील शेतकऱ्यांनी स्थगिती घेतल्यामुळे तेथे सर्व्हे करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ते काम थांबविले. मात्र स्थगिती घेतली नाही तर शेतकऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना अडविणे अवघड जाणार आहे. शुक्रवारी आलेल्या अधिकाऱ्यांना  शेतकरी मारुती होनगेकर, बाळू मेलगे, बाळाराम पाटील, प्रकाश गुरव, महादेव बिर्जे, जोतिबा मराठे यांच्यासह शेतकऱ्यांनी विरोध केला.