नेदरलँड हरले पण वाघासारखे लढले

पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा रडतखडत विजय : फहीम अश्रफ सामनावीर वृत्तसंस्था/ कोलंबो आयसीसी टी 20 वर्ल्डकपमधील पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. एका क्षणी पाकचा पराभव निश्चित वाटत होता, पण फहीम अशरफच्या वादळी फलंदाजीने सामना अक्षरश: पलटवला आणि पाकिस्तानने 3 विकेट्सने रडतखडत विजय मिळवला. कोलंबोत झालेल्या  सामन्यात नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर 148 धावांचे […]

नेदरलँड हरले पण वाघासारखे लढले

पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा रडतखडत विजय : फहीम अश्रफ सामनावीर
वृत्तसंस्था/ कोलंबो
आयसीसी टी 20 वर्ल्डकपमधील पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना अखेरच्या षटकापर्यंत रंगला. एका क्षणी पाकचा पराभव निश्चित वाटत होता, पण फहीम अशरफच्या वादळी फलंदाजीने सामना अक्षरश: पलटवला आणि पाकिस्तानने 3 विकेट्सने रडतखडत विजय मिळवला. कोलंबोत झालेल्या  सामन्यात नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर 148 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तर पाकिस्तानची सुरुवात खराब झाली होती. मधल्या षटकांत विकेट्स पडत गेल्याने संघ अडचणीत सापडला, मात्र अखेर 7 विकेट्स गमावून पाकिस्तानने लक्ष्य गाठले.
नाणेफेक जिंकून पाकने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेदरलँड्सकडून कर्णधार स्कॉट एडवर्ड्सने सर्वाधिक 37 धावा केल्या. याशिवाय, मायकेल लेविटने 24, बास लीडने 30 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाजांना मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आले. ठराविक अंतराने विकेट पडत गेल्याने नेदरलँडचा डाव 148 धावांत संपला. पाकिस्तानसाठी सलमान मिर्झाने उत्कृष्ट गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या. त्याला नवाजने 2 विकेट्स घेऊन चांगली साथ दिली. अबरार अहमदने 23 धावा देत 2 फलंदाज बाद केले.
फहीम अश्रफची शेवटच्या षटकांत कमाल
नेदरलँड्सने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सईम अयुब व साहिबजादा फरहान या जोडीने चांगली सुरूवात केली. पण अयुब 24 धावा करत झेलबाद झाला. यानंतर साहिबजादा फरहान व सलमान अली आघा यांनी शानदार फटकेबाजी केली. तर सलमान 12 धावांवर झेलबाद झाला. यानंतर साहिबजादा फरहान 47 धावा करत माघारी परतला. बाबर आझमने पुन्हा निराश केले. बाबर 15 धावा करत बाद झाला. इथूनही नेट रन रेटचा दबाव वाढत गेला. पहिले 3 फलंदाज वगळता पुढचे कोणतेही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. अखेरच्या षटकांत फहीम अशरफने मैदान गाजवले. अवघ्या 11 चेंडूत 29 धावांची धडाकेबाज खेळी करत त्याने पाकिस्तानला अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, 19 व्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर फहिमचा झेल सुटला. या संधीचे सोन करताना याच षटकात 24 धावा करत त्याने सामना पाकिस्तानच्या बाजूनं फिरवला. दुसरीकडे, नेदरलँडच्या गोलंदाजांच्या कामगिरी कौतुकास्पद ठरली.
संक्षिप्त धावफलक
नेदरलँड 19.5 षटकांत सर्वबाद 147 (मायकेल लेविट 24, बास लीड 30, स्कॉट एडवर्ड 37, सलमान मिर्झा 3 बळी, मोहम्मद नवाज, सलीम आयुब आणि अब्रार अहमद प्रत्येकी 2 बळी)
पाकिस्तान 19.3 षटकांत 7 बाद 148 (साहिबजाद फरहान 47, सलीम आयुब 24, बाबर आझम 15, फहीम अश्रफ नाबाद 29, आर्यन दत्त आणि पॉल मीकरेन प्रत्येकी 2 बळी).