विसर्जनाच्या पुर्वसंध्येला स्ट्रक्चर उभारणारी मंडळे रडारावर! स्ट्रक्चर जागेवर जप्त करण्याचा इशारा
पोलीस उपअधिक्षक अजित टिके; विसर्जनासाठी 2हजार 100 पोलीस रस्त्यावर
कोल्हापूर प्रतिनिधी
गणेश विसर्जन मिरवणूकीच्या पुर्वसंध्येला अनेक सार्वजनिक मंडळे साउंड, लाईटचे स्ट्रक्चर जोडून वाहतूकीस अडथळा करतात. अशा मंडळांवर गुन्हे दाखल करणार असून, त्यांचे स्ट्रक्चरही जप्त करणार असल्याचा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी दिला आहे. अनंत चतुर्थीच्या बंदोबस्तासाठी 2 हजार 100 पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात असणार आहेत.
विसर्जन मिरवणूकीच्या पुर्वसंध्येलाच काही तरुण मंडळे रस्त्यात वाहने लावून स्ट्रक्चर उभारणीचे काम करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. अशा मंडळांवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे. सोमवारी रात्री यापार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन गस्त घालणार असून जागेवर असे स्ट्रक्चर जप्त करण्यात येणार आहेत. बिनखांबी गणेश मंदिर ते गंगावेश या मार्गावर सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत प्रचंड गर्दी असते. नागरिकांना मिरवणूक व्यवस्थित पाहता यावी, यासाठी उलट्या दिशेने कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. जाणाऱ्या आणि येणाऱ्या नागरिकांसाठी दोन स्वतंत्र मार्ग केले जाणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. तसेच विसर्जन मार्गापासून 100 मीटर अंतरात वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गणेश विसर्जनासाठी महाद्वारमार्गे क्रशर खणीकडे जाणाऱ्या पारंपरिक विसर्जन मार्गासह सुभाषरोड, हॉकी स्टेडियम, संभाजीनगरमार्गे क्रशर खणीकडे जाणाऱ्या पर्यायी मार्गावरूनही मंडळांना विसर्जनासाठी जाता येणार आहे. महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी दोन्ही मार्ग सज्ज ठेवले आहेत.
2100 पोलिसांची फौज
विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी पोलिसांसह राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, दंगल काबू पथक आणि होमगार्ड अशी सर्व दले सज्ज झाली आहेत. विसर्जन मार्गासह क्रशर खण आणि शहरातील प्रमुख मार्गांवर 2189 पोलिस बंदोबस्तासाठी तैनात असतील.
असा असेल बंदोबस्त
अपर पोलिस अधीक्षक – 1
उपअधीक्षक – 7
पोलिस निरीक्षक – 26
सपोनि, उपनिरीक्षक – 103
अंमलदार – पुरुष – 634, महिला – 129
स्ट्रायकिंग फोर्स – 3 तुकड्या (270 जवान)
शीघ्र कृती दल – 2 तुकड्या (180 जवान)
दंगल काबू पथक – 2 तुकड्या (180 जवान)
राज्य राखीव दल – 1 तुकडी (90 जवान)
होमगार्ड – पुरुष – 523, महिला – 46