5 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार
सोमवारी बेळगावचे तापमान 39 अंशांवर : जुलाब, चक्कर येणे, अपस्मार आजारांमध्ये वाढ; जनतेने प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक
बेळगाव : बेळगावसह राज्यातील बहुसंख्य शहरांमध्ये 5 मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे जनतेने आपल्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे. 5 मेपर्यंत शक्यतो दुपारच्यावेळी बाहेर पडू नका, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. उन्हाच्या वाढत्या तडाख्याने जनतेला सळोकीपळो करून सोडले आहे. सूर्य जणू कोपला असून संपूर्ण शरीराचा दाह होतो आहे. वाढत्या उन्हामुळे तगमग वाढली आहे. त्यातच पावसाने पूर्ण पाठ फिरविली आहे. केवळ शेतकरीच नव्हे तर सर्वसामान्य जनतासुद्धा पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. हवामान खात्याने दिलेला अंदाजही चुकीचा ठरला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे बाहेर जाणे कठीण होऊन बसले आहे. परंतु घरामध्येसुद्धा राहणे अशक्य होत आहे. बेळगावसह बिदर, कलबुर्गी, विजापूर, यादगिरी, रायचूर, बागलकोट, गदग, हावेरी, कोप्पळ, बळ्ळारी, विजयनगर, दावणगेरी, चित्रदुर्ग, तुमकूर, कोलार, मंड्या व चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यात 5 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा परिणाम तीव्रपणे जाणवणार आहे.सोमवारी बेळगावचे तापमान 39 अंशांवर, विजापूर 42, बागलकोट 42, कलबुर्गी 42.8, रायचूर 41, दावणगेरी 40.5 अंशांवर होते. तापमानामध्ये वाढ झाल्याने जुलाब, चक्कर येणे, अपस्मार या आजारांची लक्षणे जाणवत आहेत, असे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर शिशु, वृद्ध, अशक्त व्यक्ती, तसेच गर्भवतींनी आरोग्याची अधिक काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. तो होऊ नये यासाठी सतत ओल्या कपड्याने शरीर पुसावे. डोक्यावर सामान्य तापमानाचे पाणी ओतून घेऊन उष्णता कमी करावी, अशा व्यक्तींना ओआरएस किंवा लिंबू सरबत द्यावे व दवाखान्यात घेऊन जावे, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.
शेतकरी, श्रमिक,सर्वसामान्यांसाठी सूचना
शेतात जर काम करावयाचे असेल तर डोक्यावर टोपी किंवा छत्री घ्या. डोके, मान, चेहरा, हात व पाय सातत्याने ओल्या कपड्याने पुसा, अशी सूचना करण्यात आली आहे. उष्णतेच्या वाढत्या लाटेचा शरीरावर परिणाम होऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यभरात किडनी स्टोनच्या विकारामध्ये वाढ झाली आहे. तसेच मूत्रविकाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. गेल्या काही वर्षांपेक्षा यावर्षी या विकाराने त्रस्त रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. साधारण एका व्यक्तीला एका दिवसाला दोन ते तीन लिटर पाण्याची गरज आहे. अतिघाम आल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाणही कमी होते. परिणामी किडनी स्टोनचा विकार वाढीस लागू शकतो, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे सातत्याने पाणी पित रहा, बाहेरील खाद्यपदार्थ टाळा, विहिरीतील तळाचे पाणी असल्यास ते उकळून प्या, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
उष्णतेच्या लाटेपासून असे संरक्षण करा…
दुपारी 12 ते 3 यावेळेत शक्यतो बाहेर जावू नका
तुम्हाला तहान लागत नसली तरी पुरेसे पाणी पित रहा
शक्यतो हलके आणि फिक्या रंगाचे कपडे वापरा
उन्हात जाताना छत्री, टोपी, चष्मा यांचा वापर करा
बाहेरचे तापमान वाढले असताना शक्यतो अतिश्रम करू नका
उभ्या केलेल्या वाहनांमध्ये मुलांना किंवा प्राण्यांना सोडू नका
चक्कर आल्यास किंवा अस्वस्थ वाटू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या