भुतरामहट्टीत वाढणार पर्यटकांचा ओघ
शाळांना सुटी असल्यामुळे संग्रहालय गजबजण्याची शक्यता : व्यवस्थापनाला दिलासा
बेळगाव : शाळा, महाविद्यालयांना सुटी पडल्याने भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात पर्यटकांचा ओघ वाढणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासकीय सुटी दिवशी देखील संग्रहालय खुले ठेवले जात आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात संग्रहालय पर्यटकांनी गजबजणार आहे. शहरापासून अवघ्या 12 कि.मी. अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाचा विकास साधण्यात आला आहे. या ठिकाणी सिंह, वाघ, बिबटे, मगर, कोल्हे, तरस, अस्वल, हरीण, चितळ, सांबर या प्राण्यांसह दुर्मीळ पक्षी ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. विशेषत: बेळगावसह गोवा आणि महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यातूनही पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. मात्र शाळा आणि परीक्षांचा कालावधी असल्याने मागील महिन्याभरात ओघ कमी झाला होता. आता शाळांना सुटी पडल्यामुळे बालचमूंसह पर्यटकांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे उन्हाळी सुटीत प्राणीसंग्रहालय पर्यटकांनी गजबजणार आहे. म्हैसूर येथील प्राणीसंग्रहालयाच्या धर्तीवर विकास साधण्यात आला आहे. तब्बल 39 एकरमध्ये पसरलेल्या प्राणीसंग्रहालयात वन्यप्राण्यांबरोबरच पक्षीसंग्रहालय आणि मत्स्यालयदेखील सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे पक्षीप्रेमी आणि मत्स्यप्रेमीही दाखल होऊ लागले आहेत. प्राथमिक, माध्यमिक आणि महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्या आहेत. गोवा आणि कोल्हापूर जिल्ह्यात प्राणीसंग्रहालय नसल्याने येथून येणाऱ्या पर्यटकांची संख्याही वाढू लागली आहे. विशेषत: शक्ती योजनेमुळे महिलांचा मोफत प्रवास सुरू झाल्याने महिला पर्यटकांचीही भर पडू लागली आहे. सध्या संग्रहालयाचा दैनंदिन महसूल 4 ते 8 लाखांपर्यंत आहे. विशेषत: शनिवारी, रविवारी महसूल वाढू लागला आहे. आता उन्हाळी हंगामात महसूल 10 लाखांपर्यंत जाईल, अशी अपेक्षा प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.
सुटी दिवशीही संग्रहालय खुले
नोकरदार, कामगार वर्गाची गैरसोय टाळण्यासाठी शासकीय सुटी दिवशीदेखील संग्रहालय खुले ठेवले जात आहे. मंगळवार वगळता सर्व दिवस संग्रहालय सकाळी 9.30 ते 5.30 यावेळेत सुरू राहात आहे. प्रौढांसाठी 50 रुपये तर लहानांसाठी 20 रुपये प्रवेश शुल्क आकारणी केली जात आहे.
उन्हाळी हंगामात उत्पन्नात वाढ होणार
शाळांना सुटी पडल्यामुळे पर्यटकांचा ओघ हळूहळू वाढू लागला आहे. वाढत्या उष्म्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात पर्यटक येवू लागले आहेत. स्थानिक पर्यटकांबरोबरच गोवा आणि महाराष्ट्रातूनही दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे उन्हाळी हंगामात उत्पन्नात वाढ होणार आहे.
-के. एन. वेण्णूर, आरएफओ भुतरामहट्टी
Home महत्वाची बातमी भुतरामहट्टीत वाढणार पर्यटकांचा ओघ
भुतरामहट्टीत वाढणार पर्यटकांचा ओघ
शाळांना सुटी असल्यामुळे संग्रहालय गजबजण्याची शक्यता : व्यवस्थापनाला दिलासा बेळगाव : शाळा, महाविद्यालयांना सुटी पडल्याने भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयात पर्यटकांचा ओघ वाढणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शासकीय सुटी दिवशी देखील संग्रहालय खुले ठेवले जात आहे. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात संग्रहालय पर्यटकांनी गजबजणार आहे. शहरापासून अवघ्या 12 कि.मी. अंतरावर असलेल्या भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालयाचा विकास साधण्यात आला आहे. या […]
