भूकंपामुळे बदलला जपानच्या किनाऱ्यांचा नकाशा

भूकंपामुळे बदलला जपानच्या किनाऱ्यांचा नकाशा

जपानमध्ये 1 जानेवारी रोजी 7.6 तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे तेथील किनाऱ्यांचा नकाशाच बदलून गेला आहे. नोटो बेटाच्या 90 किलोमीटर लांब किनाऱ्याची भूमी अनेक ठिकाणी 13 फूटांपर्यंत उंचावली आहे. तर अनेक ठिकाणी किनाऱ्यांपासून 800 फुटांपेक्षा अधिक पाणी मागे सरकले आहे. एकूण 4 चौरस किलोमीटरचा भाग समुद्रातून बाहेर पडला आहे.
चार चौरस किलोमीटरचे क्षेत्र हे न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कहून अधिक आहे. कुठल्याही देशाच्या हिशेबानुसार 4 चौरस किलोमीटरचे क्षेत्र मोठी गोष्ट नाही, परंतु एखाद्या छोट्याशा राज्यासाठी ही अत्यंत मोठी बाब आहे.
जपानमध्ये एकूण 47 परफेक्चर आहेत, हे वर्गीकरण क्षेत्रफळानुसार करण्यात आले आहे. नोटो बेटावर सर्वात मोठे परफेक्चर इशिकावाचे आहे. येथेच 4 चौरस किलोमीटरचा भाग वाढला आहे. बेटाची भूमी 4 मीटरने उंचावली आहे. तर 2 मीटरने फैलावली आहे. काही ठिकाणांवर तर जमीनच पूर्णपणे पश्चिम दिशेने सरकली आहे. हे प्रमाण 2 मीटर किंवा त्याहून अधिक आहे. इशिकावाच्या वाजिमामध्ये भूकंपामुळे किनारा 250 मीटरपर्यंत सरकला आहे. बेटाच्या उत्तर दिशेला असलेल्या बंदराच्या ठिकाणी समुद्राची पाणी मागे हटले आहे. यामुळे पूर्ण बंदरच रिकामी झाले आहे. जेथे अनेक फूट खोल पाणी हेते तेथे आता जणू दुष्काळच पडला आहे.
जपानी प्रसारमाध्यम अशाई शिम्भूननुसार इशिकावा परफेक्टरच्या 15 फिशिंग किनाऱ्यांची भूकंपानंतर उंची वाढली आहे. भूकंपामुळे अनेक किनारे कोरडे पडले आहेत. आता किनाऱ्यांवर नौका चालविणे अवघड ठरले आहे. भूकंपानंतर नोटो बेटात काइसोपासून आकासाकीपर्यंत 10 ठिकाणांवर किनारी भूमी उंचावली आहे. म्हणजे किनाऱ्यापासुन समुद्राचे अंतर वाढले आहे. याला कोसीस्मिक कोस्टल अपलिफ्ट म्हटले जाते. आकासाकी बंदरावर 14 फूट उंचीच्या त्सुनामीच्या लाटा धडकल्या होत्या. तेथील इमारतींच्या भिंतींवर याच्या खुणा दिसून येतात. जपानी अंतराळ यंत्रणा जाक्साच्या एएलओएस-2 उपग्रहाने देखील कोस्टल अपलिफ्टची नोंद केली आहे.