वाघवडे रस्त्याची अवस्था बिकट

दोन दिवसांपासून गावात येणारी बस बंद : विद्यार्थी, कामगारांचे होताहेत प्रचंड हाल बेळगाव : मच्छे ते वाघवडे रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रस्त्यावर खड्डे निर्माण होऊन वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघाताला कारण ठरत आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे. गावातून शहरामध्ये कामासाठी जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. नेहमीच […]

वाघवडे रस्त्याची अवस्था बिकट

दोन दिवसांपासून गावात येणारी बस बंद : विद्यार्थी, कामगारांचे होताहेत प्रचंड हाल
बेळगाव : मच्छे ते वाघवडे रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रस्त्यावर खड्डे निर्माण होऊन वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघाताला कारण ठरत आहे. रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांतून केली जात आहे. गावातून शहरामध्ये कामासाठी जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. नेहमीच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत.
खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्डे चुकविताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पावसाचे पाणी साचून खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वारंवार अपघात घडत आहेत. रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे गावाला सोडण्यात येणारी बस बंद करण्यात आली आहे. मच्छे ते वाघवडेपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांनाही याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे वाघवडेहून शहरामध्ये कामासाठी येणाऱ्या कामगारांना व शालेय विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरित दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी वाघवडे ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.