द.आफ्रिका महिला संघाची विजयी सलामी
पहिला टी-20 मध्ये भारताचा 12 धावांनी पराभव, सामनावीर तझमिन ब्रिट्स, कॅप यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/चेन्नई
तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत शुक्रवार येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या लढतीत तझमिन ब्रिटस् आणि मेरिझेन कॅप यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर द. आफ्रिका महिला संघाने यजमान भारतावर 12 धावांनी विजय मिळविला. भारताच्या दौऱ्यातील द. आफ्रिकेचा हा पहिला विजय आहे.
भारताच्या दौऱ्यावर आलेल्या द. आफ्रिका महिला संघाला यापूर्वी वनडे मालिका आणि त्यानंतर एकमेव कसोटी सामना गमवावा लागला. या दौऱ्याच्या अखेरीस सुरू झालेल्या टी-20 मालिकेत मात्र द. आफ्रिकेने आपल्या पराभवाची मालिका खंडित केली.
शुक्रवारच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून द. आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. द. आफ्रिकेने 20 षटकात 4 बाद 189 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 20 षटकात 4 बाद 177 धावांपर्यंत मजल मारली.
द. आफ्रिकेच्या डावाला ब्रिटस् आणि कर्णधार वूलव्हर्ट यांनी सावध सुरूवात करुन देताना 43 चेंडूत 50 धावांची भागिदारी केली. राधा यादवने वूलव्हर्टचा त्रिफळा उडविला. तीने 22 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह 33 धावा जमविल्या. ब्रिटस्ला कॅपकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 9.2 षटकात 96 धावांची भर घातली. राधा यादवने कॅपला शोभनाकरवी झेलबाद केले. कॅपने 33 चेंडुत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 57 धावा जमविल्या. ब्रिटस्ने 56 चेंडुत 3 षटकार आणि 10 चौकारांसह 81 धावांचे योगदान दिले. ट्रायॉनने 8 चेंडुत 1 षटकारासह 12 धावा केल्या. पूजा वस्त्रकरने ब्रिटस् आणि ट्रायॉन यांचे बळी मिळविले. द. आफ्रिकेच्या डावात 7 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे राधा यादव आणि पूजा वस्त्रकरने यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केल्या. द. आफ्रिकेने पॉवरप्लेच्या 6 षटकात 44 धावा जमविल्या. ब्रिटस्ने 40 चेंडुत 1 षटकार आणि 7 चौकारांसह तर कॅपने 1 षटकार आणि 8 चौकारांसह 30 चेंडूत अर्धशतक झळकविले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताच्या डावामध्ये शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी सलामीच्या गड्यासाठी 32 चेंडूत 56 धावांची भागिदारी केली. खाकाने शेफालीला झेलबाद केले. तिने 14 चेंडूत 2 चौकारांसह 18 धावा जमविल्या. ट्रायॉनने स्मृती मानधनाला यष्टीरक्षकाकरवी झेलबाद केले. तिने 30 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 46 धावा जमविल्या. मानधना बाद झाल्यानंतर पुढच्या चेंडूवर डी क्लर्कने हेमलताचा त्रिफळा उडविला. तिने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. भारताची स्थिती यावेळी 10.1 षटकात 3 बाद 87 अशी केविलवाणी होती.
कर्णधार हरमनप्रित कौर व रॉड्रीग्ज यांनी संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळाले नाही. या जोडीने 9.5 षटकात 90 धावांची भागिदारी केली. डावातील शेवटच्या चेंडूवर मलाबाने कौरला यष्टीचित केले. कौरने 29 चेंडूत 5 चौकारांसह 35 धावा जमविल्या. तर रॉड्रीग्जने एकाकी लढत देत 30 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 53 धावा जमविल्या. भारताच्या डावात 3 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. द. आफ्रिकेतर्फे खाका, ट्रायॉन, डी क्लर्क आणि मलाबा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक:
द. आफ्रिका 20 षटकात 4 बाद 189 (वूलव्हर्ट 33, ब्रिटस् 81, कॅप 57, ट्रायॉन 12, अवांतर 5, राधा यादव 2-40, वस्त्रकर 2-23), भारत: 20 षटकात 4 बाद 177 (रॉड्रिग्ज नाबाद 53, स्मृती मानधना 46, कौर 35, हेमलता 14, शेफाली वर्मा 18, अवांतर 11, खाका, ट्रायॉन, डी. क्लर्क, मलाबा प्रत्येकी 1 बळी)
Home महत्वाची बातमी द.आफ्रिका महिला संघाची विजयी सलामी
द.आफ्रिका महिला संघाची विजयी सलामी
पहिला टी-20 मध्ये भारताचा 12 धावांनी पराभव, सामनावीर तझमिन ब्रिट्स, कॅप यांची अर्धशतके वृत्तसंस्था/चेन्नई तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत शुक्रवार येथे खेळविण्यात आलेल्या पहिल्या लढतीत तझमिन ब्रिटस् आणि मेरिझेन कॅप यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर द. आफ्रिका महिला संघाने यजमान भारतावर 12 धावांनी विजय मिळविला. भारताच्या दौऱ्यातील द. आफ्रिकेचा हा पहिला विजय आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेल्या द. […]