द. आफ्रिका महिला संघाचा मालिका विजय

वृत्तसंस्था/ बेनोनी (दक्षिण आफ्रिका) यजमान दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघातील येथे खेळविण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या तझमीन ब्रिट्सला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. या मालिकेतील खेळविण्यात आलेल्या दिवस-रात्रीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 […]

द. आफ्रिका महिला संघाचा मालिका विजय

वृत्तसंस्था/ बेनोनी (दक्षिण आफ्रिका)
यजमान दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघातील येथे खेळविण्यात आलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या तझमीन ब्रिट्सला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकेतील खेळविण्यात आलेल्या दिवस-रात्रीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 316 धावा जमवित बांगलादेशला विजयासाठी 317 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशचा डाव 31.1 षटकात 100 धावात आटोपल्याने दक्षिण आफ्रिकेने हा सामना 216 धावांनी जिंकला. या मालिकेतील हा निर्णायक सामना होता. या सामन्यापूर्वी बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांनी प्रत्येकी 1 सामना जिंकून बरोबरी साधली होती.
दक्षिण आफ्रिकेच्या डावामध्ये कर्णधार लॉरा वुलवार्ट आणि तझमीन ब्रिट्स यांनी शानदार शतके झळकाविताना सलामीच्या गड्यासाठी 42.1 षटकात 243 धावांची विक्रमी भागिदारी केली. वुलवार्टने 134 चेंडूत 1 षटकार आणि 13 चौकारांसह 126 तर ब्रिट्सने 124 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 118 धावा झोडपल्या. बॉशने 19 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 28, सुने लूसने 17 चेंडूत 6 चौकारांसह 34 धावा केल्या. कॅपने 5 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 6 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 4 षटकार आणि 30 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे रबीया खानने 49 धावात 2 तर मारुफा अख्तर आणि रितू मोनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. बांगलादेशच्या केवळ 3 फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली. रितू मोनीने 67 चेंडूत 4 चौकारांसह 33, फहिमा खातूनने 26 चेंडूत 1 चौकारासह 15, नाहिदा अख्तरने 32 चेंडूत 1 चौकारासह 11 धावा केल्या. बांगलादेशच्या डावात अवांतराच्या रुपात 11 धावा मिळाल्या. त्यांच्या डावामध्ये 10 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेच्या कॅपने 21 धावात 2, ए. खाकाने 15 धावात 3, डी. क्लर्कने 10 धावात 3 तर मार्कसने 6 धावात 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका 50 षटकात 4 बाद 316 (वुलवार्ट 126, ब्रिट्स 118, बॉश नाबाद 28, लुस 34, कॅप नाबाद 6, अवांतर 4, रबिया खान 2-49, मारुफा अख्तर 1-35, रितू मोनी 1-39), बांगलादेश 31.1 षटकात सर्व बाद 100 (रितू मोनी 33, फहिमा खातून 15, नाहिदा अख्तर 11, अवांतर 11, ए. खाका 3-15, एम. कॅप 2-21, डी. क्लर्क 3-10, मार्कस 1-6).