सांगा, आम्ही श्वास तरी घ्यावा कसा?

खोदकामांमुळे संत्रस्त पणजीवासियांचा सवाल : ‘स्मार्ट सिटी’ ला खेचले उच्च न्यायालयात पणजी : अनियंत्रित आणि मनमानी ‘स्मार्ट सिटी’च्या कामामुळे वैतागलेल्या पणजीवासियांच्या सहनशक्तीचा अखेर अंत झाला, आणि येथील काही रहिवाशांनी  मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. याचिकेत अनियोजित स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे होणारी गैरसोय आणि धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार आणि ‘इमेजिन पणजी स्मार्ट […]

सांगा, आम्ही श्वास तरी घ्यावा कसा?

खोदकामांमुळे संत्रस्त पणजीवासियांचा सवाल : ‘स्मार्ट सिटी’ ला खेचले उच्च न्यायालयात
पणजी : अनियंत्रित आणि मनमानी ‘स्मार्ट सिटी’च्या कामामुळे वैतागलेल्या पणजीवासियांच्या सहनशक्तीचा अखेर अंत झाला, आणि येथील काही रहिवाशांनी  मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. याचिकेत अनियोजित स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे होणारी गैरसोय आणि धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार आणि ‘इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट महामंडळ’ यांना तातडीने निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे. या याचिकेवर पुढील मंगळवारी 26 मार्च रोजी सुनावणी होणार आहे. अनियोजित स्मार्ट सिटी प्रकल्पांमुळे पणजीत धुळीचे आणि आवाजाचे प्रदूषण वाढले असल्याने त्रासलेल्या पणजीवासियांतर्फे पियुष पांचाळ, अल्विन डीसा, नीलम नावेलकर आदींनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. वाढत्या धुळीमुळे नागरिकांना, खास करून वृद्ध आणि आजारी माणसांना श्वसनाचे आजार बळावले आहेत. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळालादेखील शहरातील दाट लोकवस्ती आणि व्यवसाय असलेल्या ठिकाणी या प्रदूषणची दखल घेण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आम्हा पणजी रहिवाशांना दिलासा देण्यासाठी आणि प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली या याचिकेत करण्यात आली आहे.  या याचिकेत ‘इमेजिन पणजी स्मार्ट सिटी’ यांच्यासह गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, पणजी मनपा, आरोग्य खाते, वाहतूक पोलीस अधीक्षक आणि इतर सरकारी एजन्सींना प्रतिवादी करण्यात आले आहे.
निदान मुलांना परीक्षा तरी देऊ द्या
पणजीत चालू असलेल्या खोदकामांमुळे जवळपास सर्व रस्ते आणि गल्ल्या खोदल्या असल्याने वाहतूक बंद झाली आहे. ‘इमेजिन पणजी स्मार्ट सिटी’ ने श्रीमहालक्ष्मी मंदिर आणि मुष्टिफंड शाळेजवळ खोदकाम सुरू केले. शाळेत सुरू असलेल्या बोर्डाच्या परीक्षांमुळे एका संस्थेने मार्चअखेरपर्यंत कामे पुढे ढकलण्याची विनंती केली होती. परंतु काम सुरूच ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गैरसोय आणि धूळ प्रदूषण होऊन मंदिराच्या दर्शनार्थींवरही त्याचा परिणाम झाल्याची माहिती याचिकाकर्त्याने दिली आहे.