टीम इंडियाचा झिम्बाब्वेवर दणकेबाज विजय

युवा ब्रिगेडने काढला पराभवाचा वचपा : दुसऱ्या टी 20 सामन्यात 100 धावांनी उडवला धुव्वा : वृत्तसंस्था/ हरारे टीम इंडियाने रविवारी झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात झिम्बाब्वेवर 100 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताच्या युवा ब्रिगेडने पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा देखील काढला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 2 बाद 234 धावा केल्या. विजयासाठीच्या 235 धावांच्या […]

टीम इंडियाचा झिम्बाब्वेवर दणकेबाज विजय

युवा ब्रिगेडने काढला पराभवाचा वचपा : दुसऱ्या टी 20 सामन्यात 100 धावांनी उडवला धुव्वा :
वृत्तसंस्था/ हरारे
टीम इंडियाने रविवारी झालेल्या दुसऱ्या टी 20 सामन्यात झिम्बाब्वेवर 100 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताच्या युवा ब्रिगेडने पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा देखील काढला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकांत 2 बाद 234 धावा केल्या. विजयासाठीच्या 235 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ 134 धावांत ऑलआऊट झाला. भारताने या विजयासह पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. उभय संघातील तिसरा सामना दि. 10 रोजी हरारे येथे होईल.
भारताने विजयासाठी दिलेल्या 235 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. सलामीवीर वेस्ले मेडवेरेने सर्वाधिक 43 धावा केल्या तर ल्युक ज्योंगवेने 33 धावांचे योगदान दिले. याशिवाय, ब्रायन बेनेटे 26 धावा फटकावल्या. इतर फलंदाजांनी मात्र भारतीय गोलंदाजासमोर सपशेल लोटांगण घातले. झिम्बाब्वेचा डाव 134 धावांवर आटोपला. भारताकडून आवेश खान व मुकेश कुमार यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले तर फिरकीपटू रवि बिष्णोईने दोन विकेट्स घेतल्या.
हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, या सामन्यात कर्णधार गिलने खलील अहमद वगळत साई सुदर्शनला स्थान दिले. सुदर्शनने या सामन्याद्वारे टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शनिवारी अभिषेक शर्मा, रियान पराग व ध्रुव जुरेल यांनी पदार्पण केले होते.
अभिषेक शर्माचे तुफानी शतक
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. कर्णधार शुभमन गिल दुसऱ्याच षटकात मुजारबानीच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मा व ऋतुराज गायकवाड यांनी संघाचा डाव सावरला. या जोडीने चौकार-षटकारांची आतषबाजी करताना झिम्बाब्वेच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई केली. या जोडीने 137 धावांची भागीदारी साकारली. अभिषेकने आपल्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात शतक पूर्ण केले. अभिषेकने अवघ्या 46 चेंडूत 8 षटकार आणि 7 चौकारासह 100 धावा केल्या. विशेष म्हणजे, शनिवारी आपल्या पहिल्याच सामन्यात त्याला भोपळाही फोडता आला नव्हता, मात्र दुसऱ्याच सामन्यात धमाकेदार खेळी साकारली. अभिषेकने 33 चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले, यानंतर मात्र अवघ्या 13 चेंडूत त्याने तुफानी फटकेबाजी करत शतक झळकावले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 212.77 असा होता. शतकानंतर मात्र तो लगेच बाद झाला.
ऋतुराज गायकवाडची अर्धशतकी खेळी, रिंकूचीही फटकेबाजी
अभिषेक बाद झाल्यानंतर ऋतुराज व रिंकू सिंगने संघाच्या धावगतीला आकार दिला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 36 चेंडूत 87 धावांची नाबाद भागीदारी केली. अभिषेकनंतर या दोघांनीही झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना चांगलेच धुतले. ऋतुराजने शानदार खेळी साकारताना 47 चेंडूत 11 चौकार व 1 षटकारासह नाबाद 77 धावा केल्या. तर रिंकूने आक्रमक खेळताना अवघ्या 22 चेंडूत 2 चौकार व 5 षटकारासह नाबाद 48 धावांचे योगदान दिले. अभिषेक शर्माचे शतक, ऋतुराज गायकवाडचं अर्धशतक आणि रिंकू सिंगच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 20 ओव्हरमध्ये 2 बाद 234 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
भारत 20 षटकात 2 बाद 234 (शुभमन गिल 2, अभिषेक शर्मा 47 चेंडूत 7 चौकार व 8 षटकारासह 100, ऋतुराज गायकवाड 47 चेंडूत 11 चौकार व 1 षटकारासह नाबाद 77, रिंकू सिंग 22 चेंडूत 2 चौकार व 5 षटकारासह नाबाद 48, मुजारबानी व वेलिंग्टन मसाकदझा प्रत्येकी एक बळी).
झिम्बाब्वे 18.4 षटकांत सर्वबाद 134 (वेस्ली मेडवेरे 43, ब्रायन बेनेट 26, जोनाथन कॅम्पबेल 10, ल्युक ज्योंगवे 33, मुकेश कुमार व आवेश खान प्रत्येकी तीन बळी, रवि बिष्णोई 2 बळी).
कारकिर्दीत दुसऱ्याच सामन्यात शतक, अभिषेक शर्माचा अनोखा विक्रम
टीम इंडियाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माने आपल्या करिअरच्या दुसऱ्याच सामन्यात शतकी खेळी साकारली. अभिषेकने 46 चेंडूंचा सामना करताना 100 धावा केल्या. यासह टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यात शतक झळकावणारा तो भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला. याबाबतीत विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुलसह अनेक दिग्गज मागे राहिले. भारतासाठी सर्वात कमी सामने खेळताना पहिले टी 20 शतक ठोकण्याचा विक्रम दीपक हुडाच्या नावावर होता. त्याने तिसऱ्या सामन्यात शतक केले होते. पण अभिषेकने दुसऱ्याच सामन्यात ही कामगिरी केली.
टी 20 क्रिकेटमध्ये कमी डावात शतक झळकावणारे भारतीय खेळाडू

अभिषेक शर्मा – दोन सामने
दीपक हुडा – तीन सामने
केएल राहुल – चार सामने
यशस्वी जैस्वाल – सहा सामने
शुभमन गिल – सहा सामने.

टी 20 मध्ये शतक करणारा चौथा युवा खेळाडू
टीम इंडियासाठी टी 20 सामन्यात शतक झळकावणाऱ्या सर्वात तरुण खेळाडूंच्या यादीत अभिषेक शर्मा चौथ्या स्थानावर आहे. या यादीत यशस्वी जैस्वाल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने वयाच्या 21 वर्षे 279 दिवसांत शतक झळकावले होते.
टी 20 मध्ये शतक झळकावणारे युवा भारतीय खेळाडू
21 वर्ष 279 दिवस – यशस्वी जैस्वाल
23 वर्ष 146 दिवस – शुभमन गिल
23 वर्ष 156 दिवस – सुरेश रैना
23 वर्ष 307 दिवस – अभिषेक शर्मा.
झिम्बाब्वेविरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या
रविवारी शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्ध 20 षटकात 2 बाद 234 धावा केल्या. विशेष म्हणजे, झिम्बाब्वेविरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाने झिम्बाब्वेविरुद्ध 2 बाद 229 धावा केल्या होत्या.