मोपा येथील माऊली एकता संस्थेच्या वर्धापनदिन निमित्त नाट्य महोत्सव

प्रतिनिधी बांदा मोपा गावातील गेली १७ वर्षे सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माऊली एकता कला क्रीडा संस्थेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त पहील्या कै. विठ्ठल लक्ष्मण नाईक गावकर नाट्य महोत्सवाचे आयोजन शुक्रवार १९ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. मोपा येथील श्री देव गिरोबा रंगमंचावर सदर महोत्सव होईल. माऊली एकता कला क्रीडा संस्था आणि […]

मोपा येथील माऊली एकता संस्थेच्या वर्धापनदिन निमित्त नाट्य महोत्सव

प्रतिनिधी
बांदा
मोपा गावातील गेली १७ वर्षे सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माऊली एकता कला क्रीडा संस्थेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त पहील्या कै. विठ्ठल लक्ष्मण नाईक गावकर नाट्य महोत्सवाचे आयोजन शुक्रवार १९ जानेवारी रोजी करण्यात आले आहे. मोपा येथील श्री देव गिरोबा रंगमंचावर सदर महोत्सव होईल.
माऊली एकता कला क्रीडा संस्था आणि कला व सांस्कृतिक संचालनालय पणजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या नाट्य महोत्सवाचे उदघाटन शुक्रवार १९ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३०वाजता पेडणेचे आमदार तथा गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कला व सांस्कृतिक संचालनालयाचे सहाय्यक संचालक मिलिंद माटे, गोमंतकीय दिंडी सम्राट बाबु गडेकर, ज्येष्ठ संगीतकार नाना आसोलकर, तोरसे जिल्हा पंचायत सदस्या सीमा खडपे, सरपंच सुबोध महाले, तांबोसे मोपा उगवे पंचायतीचे पंच सदस्य आणि सातेरी माऊली देवस्थानचे प्रमुख महाजन मंडळी उपस्थित राहणार आहेत . या कार्यक्रमात पूर्वी वॉटर सप्लाय मोपा यांच्या सहकार्याने व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मोपा गावतील नाट्य क्षेत्रातील योगदान दिलेल्या कलाकार तथा मान्यवरांचे सत्कार करण्यात येणार आहेत. आपल्या काळात रंगभूमीला योगदान देणाऱ्या दिवंगत कलाकारांचा मरणोत्तर सन्मान करण्यात येणार आहे. या नाट्य महोत्सवाचे पहिले नाट्य पुष्प रंगकर्मी कै. विठ्ठल लक्ष्मण नाईक गावकर यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे. शुक्रवार १९ रोजी रात्री ९ वाजता प्रवीण मराठे लिखित व दिग्दर्शीत ‘दगडू सावधान’ हे मराठी विनोदी नाटक होईल. दुसरे नाट्यपुष्प रंगकर्मी कै. राजाराम रामचंद परब व कै. अजीत वसंत बागवे (तबलापटू )यांच्या स्मृतीला अर्पण केले आहे. शनिवार २० जानेवारी रोजी दाडोबा क्रिएटिव्ह मोरजी यांचे संगीत ‘कधीतरी कोठेतरी’ हे नाटक होईल.रविवार २१ रोजी सात पाटेकर दशावतार नाट्यमंडळ निरवडे याचा ‘शुक्र आणि मंगळ युद्ध’ हा नाट्यप्रयोग होणार आहे. या नाट्य महोत्सवाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सत्यवान नाईक गावकर यांनी केले आहे.