हलगा-मच्छे रस्त्याच्या कामाला स्थगिती

उच्च न्यायालयाचा कामबंद ठेवण्याचा आदेश : शेतकऱ्यांना मिळाला दिलासा : आंदोलन कऊन केला होता विरोध बेळगाव : हलगा-मच्छे बायपासचे काम युद्धपातळीवर करण्यात येत होते. पूर्वी असलेली स्थगिती उठविली होती. याचबरोबर येथील दिवाणी न्यायालयाने त्रिशंकू निकाल दिला होता. त्याचा फायदा उठवत हलगा-मच्छे बायपासचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र धारवाड येथील उच्च न्यायालयाने रस्त्याच्या कामाला स्थगिती […]

हलगा-मच्छे रस्त्याच्या कामाला स्थगिती

उच्च न्यायालयाचा कामबंद ठेवण्याचा आदेश : शेतकऱ्यांना मिळाला दिलासा : आंदोलन कऊन केला होता विरोध
बेळगाव : हलगा-मच्छे बायपासचे काम युद्धपातळीवर करण्यात येत होते. पूर्वी असलेली स्थगिती उठविली होती. याचबरोबर येथील दिवाणी न्यायालयाने त्रिशंकू निकाल दिला होता. त्याचा फायदा उठवत हलगा-मच्छे बायपासचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र धारवाड येथील उच्च न्यायालयाने रस्त्याच्या कामाला स्थगिती दिली असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पुन्हा हे काम थांबवावे लागणार आहे. हलगा-मच्छे बायपास रस्ता करण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने युद्धपातळीवर काम सुरू केले होते. या रस्त्याविरोधात  शेतकऱ्यांनी गेली दहा वर्षे लढा उभा केला आहे. रस्त्यावरील लढाईबरोबरच न्यायालयीन लढाईही लढली आहे. येथील आठवे अतिरिक्त दिवाणी न्यायालयाने या रस्त्याचे काम करता येणार नाही, असा निकाल दिला. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पहिले अतिरिक्त उच्च दिवाणी न्यायालयाने त्रिशंकू निकाल दिला. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्याचा आधार घेत या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली. शेतकऱ्यांनी विरोध करताच त्यांना अटक केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्या ठिकाणी न्यायालयाने रस्त्याचे काम पूर्णपणे थांबवावे, असा निकाल देत या कामाला स्थगिती दिली आहे. शेतकऱ्यांच्यावतीने अॅड. रवीकुमार गोकाककर यांनी न्यायालयामध्ये स्थगिती अर्ज दाखल केला. शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांनी युक्तिवाद केला. उच्च न्यायालयाने बाजू ऐकून घेऊन  स्थगिती दिली आहे. गुरुवारी स्थगिती अर्जावर न्यायालय निकाल देणार असल्याने  शेतकरी रमाकांत बाळेकुंद्री, सुभाष चौगुले, गोपाळ सोमणाचे, अनिल अनगोळकर, राजू मरवे, भैरू कंग्राळकर, महेश चतुर, नितीन पैलवानाचे, मनोहर कंग्राळकर यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.
भर उन्हात केले होते शेतकऱ्यांनी आंदोलन
तहान, भूक हरवून बळीराजाने भर उन्हामध्ये आंदोलन केले. लोटांगण आंदोलन करून शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शविला होता. तरीदेखील या रस्त्याचे काम सुरूच होते. जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची भेट घेऊन काम थांबविण्याची विनंती केली. मात्र न्यायालयाचा निकाल दाखवा, आम्ही काम थांबवू, असे त्यांनी सांगितले होते. आता न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनाही आता शेतकऱ्यांचा विचार करावा लागणार आहे. सुपीक जमीन या रस्त्यामध्ये जात आहे. ती जमीन वडिलोपार्जित असल्यामुळे आईच्या प्रेमाप्रमाणेच त्या जमिनीवरदेखील बळीराजाचे प्रेम आहे. मात्र जमीन हिसकावून घेतली जात होती. त्यामुळे शेतकरी तणावाखाली होता. आता न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे काम थांबणार असल्याने बळीराजामधून समाधान व्यक्त होत आहे.
तातडीने थांबविले काम
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू होते. यरमाळ येथून मोठ्या प्रमाणात खडी व माती आणली जात होती. मात्र उच्च न्यायालयाने स्थगिती देताच ते काम कंत्राटदाराने थांबविले. या रस्त्यावरील वाहने देखील बाजूला घेण्यात आली. तसेच यरमाळवरुन माती घेऊन येणारे टिप्पर देखील दुसऱ्या जागेमध्ये उभे करुन माती टाकण्यात आली आहे. पोलीस निरीक्षकांनीही तातडीने जावून कंत्राटदाराला काम बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.