सुर्याचे नाबाद शतक, मुंबईचा धमाकेदार विजय
हैदराबादवर 7 गडी राखून मात : सूर्याच्या 51 चेंडूत नाबाद 102 धावा
वृत्तसंस्था/ मुंबई
हार्दिक पंड्या व पियुष चावला यांचा भेदक मारा आणि सूर्यकुमार यादवच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने हैदराबादचा 7 विकेटने पराभव केला. सूर्यकुमार यादवने 51 चेंडूमध्ये वादळी शतक ठोकले. हैदराबादने दिलेले 174 धावांचे आव्हान मुंबईने 7 विकेट आणि 16 चेंडू राखून सहज पार केले. दरम्यान, मुंबईविरुद्ध पराभवानंतर हैदराबादचे प्लेऑफचे गणित अवघड झाले आहे. आता हैदराबादला पुढील प्रत्येक सामन्यात विजय अनिवार्य असेल.
सोमवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने हैदराबादवर सात विकेटने विजय मिळवताना पराभवाचा वचपा काढला. साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात हैदराबादने मुंबईचा दारुण पराभव केला होता. हैदराबादने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेत 277 धावांचा पाऊस पाडला होता. याच पराभवाचा वचपा आज मुंबईने काढला. 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने तीन विकेट गमावत 17.2 षटकात पार केले.
सूर्याचे नाबाद शतक
हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 174 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर इशान किशन 9 धावांवर बाद झाला तर रोहित शर्मा या सामन्यातही अपयशी ठरला. नमन धीरला भोपळाही फोडता आला नाही. सलामीची तीनही फलंदाज अवघ्या 31 धावांत बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादव व तिलक वर्माने मुंबईला सावरले. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी 143 धावांची भागीदारी करत संघाला 17.2 षटकांतच विजय मिळवून दिला. सुर्याने 51 चेंडूमध्ये 102 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीमध्ये सूर्याने 12 चौकार आणि सहा षटकारांचा पाऊस पाडला. त्याचे आयपीएलमधील दुसरे शतक ठरले. तिलक वर्माने त्याला नाबाद 37 धावा करत चांगली साथ दिली. सूर्यकुमार यादवपुढे हैदराबादची गोलंदाजी फ्लॉप ठरली. भुवनेश्वर कुमार, मार्को यान्सन आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
पराभवामुळे हैदराबादच्या अडचणीत वाढ
प्रारंभी, मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादची सुरुवात शानदार झाली, पण त्यानंतर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे फलंदाजी कोसळली. अभिषेक शर्मा 11 धावांवर बाद झाला. यानंतर मयंक अगरवाल पाच धावा करता आल्या. दोन विकेट झटपट गेल्यानंतर हेड आणि रेड्डी यांनी हैदराबादच्या डावाला आकार दिला. ट्रेविस हेड आणि रेड्डी यांच्या जोडी जमली असे वाटत होते, पण अनुभवी पियुष चावलाने हेडला बाद करत हैदराबादला मोठा धक्का दिला. हेडने 30 चेंडूमध्ये 48 धावांची खेळी केली. हेड बाद झाल्यानंतर हेनरिक क्लासेनही लगेच तंबूत परतला. पियुष चावलानेच त्याचा अडथळा दूर केला. क्लासेन फक्त दोन धावांवर त्रिफाळाचीत झाला. नितीश रेड्डीला मोठी खेळी करता आली नाही. 15 चेंडूमध्ये 20 धावा काढून बाद झाला. आघाडीची फळी ढेपाळल्यानंतर शाहबाज अहमद आणि मार्को यान्सन यांनी डाव संभाळण्याचा प्रयत्न केला. पण मुंबईच्या गोलंदाजीसमोर ठरावीक अंतराने हैदराबादने विकेट फेकल्या. मार्को यान्सनने 12 चेंडूमध्ये 17 धावा जोडल्या. त्यानं आपल्या खेळीमध्ये एक चौकार आणि एक षटकार ठोकला. तर शाहबाद अहमदने 12 चेंडूत 10 धावा केल्या. अब्दुल समद फ्लॉप ठरला तर समदला फक्त तीन धावा काढता आल्या.
कर्णधार पॅट कमिन्सने शेवटच्या हाणामारीच्या षटकांत 17 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारासह नाबाद 35 धावा करत संघाला 173 धावापर्यंत मजल मारुन दिली. सनवीर सिंग 8 धावांवर नाबाद राहिला. मुंबईकडून हार्दिक पंड्या व पियुष चावला यांनी शानदार गोलंदाजी करताना प्रत्येकी तीन बळी घेतले. मुंबईविरुद्ध जरी पराभव झाला असला तरी हैदराबादचा संघ 12 गुणासह चौथ्या स्थानी आहे. अद्याप त्यांचे तीन सामने बाकी असले तर नेट रनरेट त्यांचे मायनसमध्ये आहे. याशिवाय, इतर संघही प्लेऑफच्या शर्यतीत असल्यामुळे पुढील तीनही सामन्यात त्यांना विजय अनिवार्य असणार आहे.
संक्षिप्त धावफलक
सनरायजर्स हैदराबाद 20 षटकांत 8 बाद 173 (ट्रेव्हिस हेड 48, नितिश कुमार रे•ाr 20, क्लासेन 2, यान्सेन 17, शाहबाज अहमद 10, पॅट कमिन्स नाबाद 35, हार्दिक पंड्या व पियुष चावला प्रत्येकी तीन बळी, बुमराह व कंबोज प्रत्येकी 1 बळी).
मुंबई इंडियन्स 17.2 षटकांत 3 बाद 174 (इशान किशन 9, रोहित शर्मा 4, नमन धीर 0, सुर्यकुमार यादव 51 चेंडूत 12 चौकार व 6 षटकारासह नाबाद 102, तिलक वर्मा नाबाद 37, भुवनेश्वर कुमार, यान्सेन व पॅट कमिन्स प्रत्येकी एक बळी).
Home महत्वाची बातमी सुर्याचे नाबाद शतक, मुंबईचा धमाकेदार विजय
सुर्याचे नाबाद शतक, मुंबईचा धमाकेदार विजय
हैदराबादवर 7 गडी राखून मात : सूर्याच्या 51 चेंडूत नाबाद 102 धावा वृत्तसंस्था/ मुंबई हार्दिक पंड्या व पियुष चावला यांचा भेदक मारा आणि सूर्यकुमार यादवच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने हैदराबादचा 7 विकेटने पराभव केला. सूर्यकुमार यादवने 51 चेंडूमध्ये वादळी शतक ठोकले. हैदराबादने दिलेले 174 धावांचे आव्हान मुंबईने 7 विकेट आणि 16 चेंडू राखून सहज […]