प्रचंड दगड पडूनही जिवंत

‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण आपल्याला परिचित आहे. काहीवेळा माणूस अशा काही परिस्थितीत सापडतो, की तो आता वाचत नाही, अशी साऱ्यांची समजूत झालेली असते. तथापि, अशाही अवघड किंवा अशक्य परिस्थितीतून तो आश्चर्यकारकरित्या वाचतो. इतकेच नव्हे, तर धडधाकट स्थितीत सुखरुप राहतो. अशा उदाहरणांवरुनच ही म्हण निर्माण झाली असावी. अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स प्रांतात राहणाऱ्या माईक वोलो […]

प्रचंड दगड पडूनही जिवंत

‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण आपल्याला परिचित आहे. काहीवेळा माणूस अशा काही परिस्थितीत सापडतो, की तो आता वाचत नाही, अशी साऱ्यांची समजूत झालेली असते. तथापि, अशाही अवघड किंवा अशक्य परिस्थितीतून तो आश्चर्यकारकरित्या वाचतो. इतकेच नव्हे, तर धडधाकट स्थितीत सुखरुप राहतो. अशा उदाहरणांवरुनच ही म्हण निर्माण झाली असावी.
अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स प्रांतात राहणाऱ्या माईक वोलो नामक व्यक्तीच्या जीवनात अशी घटना घडली आहे. 2003 मध्ये ते संगमरवराच्या मोठ्या लाद्या एका वाहनातून दुसऱ्या जागी ठेवण्यासाठी हलवत होते. हे काम ते स्वत:साठी नव्हे, तर आपल्या एका मित्राला साहाय्य करण्यासाठी करत होते. अचानक त्यांच्या अंगावर संगमरवराच्या लाद्या एकपाठोपाठ एक अशा पडल्या. ते या लाद्यांखाली अक्षरश: दबले गेले. त्यांच्या चेहऱ्यावरही लाद्या पडल्या. या लाद्या वजनदार असल्याने त्या पटकन् बाजूला करुन त्यांचा जीव वाचविणे अशक्यच होते. त्यामुळे आता त्यांचे काय होणार, या चिंतेने आजूबाजूची माणसे अक्षरश: दिग्मूढ झाली होती. अखेर काही काळानंतर त्यांच्या अंगावर पडलेल्या लाद्या दूर करण्यात यश आले. पण तोपर्यंत त्यांचा श्वास बंद पडला होता. ते जवळजवळ मृतावस्थेतच होते. त्यांचा मित्र त्यांच्या जवळ गेला तेव्हा त्यालाही त्यांचा प्राण गेला आहे, असेच दिसून आले. तथापि, अशा अवस्थेत पाच दहा मिनिटे गेल्यानंतर अचानक त्यांचा नाकपुड्या हालू लागल्या आणि त्यांचा श्वासोछ्श्वास पुन्हा होऊ लागला. त्वरित त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. चेहऱ्यावर लाद्या पडल्याने त्यांचा चेहरा छिन्नविछिन्न झाल्यात जमा होता. त्यांच्या गालाची हाडे मोडली होती. त्यांच्यावर बरेच दिवस उपचार करावे लागले. त्यांच्या चेहऱ्याची प्लॅस्टिक सर्जरी करावी लागली. या शस्त्रक्रियेच्या सहाय्याने त्यांचा चेहरा बराचसा पूर्ववत करण्यात आला. तथापि, ते वाचले आणि पूर्ण बरेही झाले. ही घटना घडली ते तेव्हा ते तरुण वयाचे होते. त्यांनी नंतर क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी करुन दाखविली.