रिंगरोडमधील झाडांचा सर्व्हे सुरू

स्थगिती घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी वगळून सर्व्हेला सुरुवात : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण बेळगाव : रिंगरोडसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बागायत खात्याला झाडांचा सर्व्हे करण्यासाठी सूचना केली आहे. त्यानुसार बागायत खात्याने विविध भागांमध्ये जाऊन झाडांवर क्रमांक घातले आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही मोजक्याच शेतकऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे […]

रिंगरोडमधील झाडांचा सर्व्हे सुरू

स्थगिती घेतलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी वगळून सर्व्हेला सुरुवात : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
बेळगाव : रिंगरोडसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बागायत खात्याला झाडांचा सर्व्हे करण्यासाठी सूचना केली आहे. त्यानुसार बागायत खात्याने विविध भागांमध्ये जाऊन झाडांवर क्रमांक घातले आहेत. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. काही मोजक्याच शेतकऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या रस्त्यासाठी हालचाली गतिमान करत असल्याचे दिसून येत आहे. रस्त्यामध्ये येणाऱ्या झाडांची संख्या किती आहे, याबाबतची अद्याप आकडेवारी निश्चित झाली नसल्याचे सांगण्यात आले. काजू, आंबा, नारळ या झाडांची किंमत वेगवेगळ्या वर्गवारीनुसार केली जाणार आहे. त्याचबरोबर इतर जंगली झाडांचीही किंमत ठरविण्यात येणार आहे. संबंधित सर्व्हे क्रमांकांमधील झाडांची आकडेवारी काढून संबंधित शेतकऱ्याला रक्कम दिली जाणार आहे. बेळगुंदी, बाची, बिजगर्णी परिसरामध्ये झाडांचा सर्व्हे करण्यात आला आहे. अनेक झाडांवर नंबर घालण्यात आले आहेत. हे काम बागायत खाते करत आहे, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. सध्या काही शेतकऱ्यांनी न्यायालयातून स्थगिती मिळविली आहे. तर काही शेतकरी न्यायालयातून स्थगिती मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी स्थगिती घेतली तरच शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.