‘न्यूजक्लिक’चे प्रबीर पुरकायस्थ यांची तात्काळ सुटका करण्याचे ‘सर्वोच्च’ आदेश

‘न्यूजक्लिक’चे प्रबीर पुरकायस्थ यांची तात्काळ सुटका करण्याचे ‘सर्वोच्च’ आदेश

UAPA कायद्यांतर्गत अटक केलेले न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणामध्ये पुरकायस्थ यांची अटक आणि त्यानंतरची त्यांना दिली गेलेली कोठडी अवैध असल्याचंही सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती बी.आर. गावी आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने प्रबीर पूरकायस्थ यांच्या कोठडी अर्जावर निर्णय घेण्यापूर्वी अटकेचे कोणतेच कारण दिले गेले नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्याने सर्वोच्च न्यायालयाने प्रबीर पुरकायस्थ काही अटींवर जामिनावर तात्काळ सुटका करण्याचे निर्देश दिले.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने न्यूजक्लिकचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना “भारताच्या सार्वभौमत्वाला बाधा पोहोचवण्याच्या आरोपा खाली” आणि देशाविरूद्ध असंतोष निर्माण करण्यासाठी चीनकडून फंडींग मिळवल्याच्या आरोपाखाली 3 ऑक्टोबरला अटक केली होती. तसेच प्रबीर पुरकायस्थ यानी 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी पीपल्स अलायन्स फॉर डेमोक्रसी अँड सेक्युलॅरिझम या गटाबरोबर कट रचला असल्याचा आरोपही पोलिसांनी केला होता.
एनआयए ने देशभरात छापे टाकून अनेक संशियातांना अटक केली होती. याच वेळी न्यूजक्लिकच्या कार्यालयातून आणि पत्रकारांच्या निवासस्थानातून सुमारे 300 इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स जप्त करण्यात आली होती. अमेरिकेतील द न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित केलेल्या लेखानंतर ही अटकसुत्र राबवण्यात आले.